चालता बोलता वृद्धाला लुटले, पादचाऱ्यांना लुटणारे त्रिकूट गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलुंड पश्चिमेकडील एका इमारतीमधील दुकानाच्या समोर हेरून तिघांनी एका वृद्धाला लुटले. आजूबाजूला असणाऱयांना समजणारही नाही अशा पद्धतीने आरोपींनी चाकूचा धाक दाखवून वृद्धाची सोन्याची चेन, ब्रेसलेट, अंगठय़ा असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला, पण मुलुंड पोलिसांनी त्या तिघांनाही शोधून त्यांना बेडय़ा ठोकल्या.

ठाण्याच्या किसन नगरात राहणारे मधुकर दळवी (60) हे मुलुंडमधील पोस्ट ऑफिसमध्ये कामानिमित्त आले होते, परंतु पोस्ट ऑफिस बंद असल्याने ते माघारी फिरले. दळवी सेवाराम लालवानी मार्गावरील विद्याविहार मॅरेथॉन बिल्डिंगच्या खालील दुकानाच्या समोरील फुटपाथवर आले असता एका तरुणाने त्यांना अडवून ओळख काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी मागून आलेल्या दोघांनी दळवी यांना चाकूचा धाक दाखवत त्यांचे सोन्याचे ब्रेसलेट, चेन, हातामधील तीन अंगठय़ा व पाकिटामधील दोन हजार रुपये रोख रक्कम काढून पोबारा केला. याप्रकरणी दळवी यांनी तक्रार दिल्यानंतर मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते, उपनिरीक्षक कांचन थोरात तसेच कोळी, बोडके, वाळे, विंचू, पारधी, निकम, नलावडे या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी हे अभिलेखावरील गुन्हेगार रमेश जयस्वाल, नरेश जयस्वाल, संजय मांगडे हे असल्याचे स्पष्ट झाले. मग खबऱयांना कामाला लावून आरोपींचा मग काढला असता ते तिघेही महापे येथील एका लॉजमध्ये लपले असल्याचे कळताच पोलिसांनी तेथे जाऊन तिघांना पकडले.

तिघांचे गुह्यांचे शतक
अटक केल्यानंतर तिघांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी नवघर, पंतनगर, भोईवाडा, विलेपार्ले, बाजारपेठ कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, वांद्रे, सांताक्रुझ, मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस परिसरात गुन्हे केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून 14 लाख 85 हजार किमतीचे सोने हस्तगत करण्यात आले आहे. या आरोपींविरोधात 100 हून अधिक गुह्यांची नोंद आहेत.