विरारमध्ये बंद घरात तीन भाऊ-बहिणींचे मृतदेह आढळले; विषप्राशन करून जीवन संपवल्याचा संशय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी परिसरात एक धक्कादायक घटना घडली. येथील ‘के 3 डी विंग एव्हेन्यू’ (K3 K Avenue) या इमारतीतील फ्लॅट क्रमांक 1203 मध्ये तीन भाऊ-बहिणींचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या तिघांनी विषप्राशन करून आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

संबंधित फ्लॅटमधून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने स्थानिक रहिवाशांनी इमारतीच्या सचिवांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मृतांपैकी एका व्यक्तीचे नाव कुमार मेहता असल्याची माहिती मिळाली असून, तिन्ही भावंडांचे वय 40 वर्षांपेक्षा अधिक असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

घटनास्थळी पोलिसांसह फॉरेन्सिक पथक दाखल झाले असून, घरातील परिस्थितीची पाहणी करून आवश्यक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळाबाहेर तीन रुग्णवाहिका दाखल झाल्या असून, नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे. मृत्यूचे नेमके कारण आणि वेळ निश्चित करण्यासाठी पुढील तपास करण्यात येत आहे.

दरम्यान, या इमारतीत वर्षभरात आत्महत्येची ही तिसरी घटना असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी दोन महिन्यांपूर्वी एका माजी लष्करी अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्याआधी दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

एकाच इमारतीत वर्षभरात घडलेल्या या तीन घटनांमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. सध्याच्या घटनेमागील नेमके कारण काय, तिन्ही भावंडांचा मृत्यू कशामुळे झाला आणि या प्रकरणाशी संबंधित अन्य काही बाबी आहेत का, याचा तपास पोलीस करीत आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.