
पुणे शहर परिसरात वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह तिघांना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनकडून अटक करण्यात आली. आरोपींकडून चोरीचे दोन ट्रॅक्टर, एक छोटा हत्ती आणि पाच दुचाकी अशी 8 वाहने जप्त करण्यात आली आहे. आरोपींनी ही वाहने शहरातील विविध भागातून चोरल्याचे समोर आले आहे.
समाधान देविदास राठोड (22, रा. येवला,जि.नाशिक), प्रकाश श्रीराम आढाव (वय 30, रा. तळेगाव ढमढेरे), आकाश बबन धोत्रे (वय 27, रा तळेगाव ढमढेरे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शहरात वाहनचोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. यानुसार दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्त घालत होते.
पोलिसांनी शहरातील 200 ते 250 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून शोध घेतला असता आरोपी राठोड, आढाव, धोत्रे हे वाहनचोरी करताना आढळून आले. यानुसार अंमलदार अमोल सरतापे, राहुल इंगळे, विनायक येवले यांनी तब्बल 200 ते 250 सीसीटीव्ही फुटेज त व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 12 लाख 40 हजार रुपये किंमतीच्या तीन चारचाकी आणि पाच दुचाकी जप्त करण्यात आले आहेत. आरोपींनी लोणीकंद , चंदननगर, खडकी, मुंढवा, चाकण व कोपरगाव येथून ही वाहने चोरल्याचे समोर आले आहे.
गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, अंमलदार शिवाजी जाधव, संदीप येळे, सुदेश सपकाळ यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.




























































