अमेरिकेत पुन्हा गोळीबार, न्यूयॉर्कमध्ये गोळीबारात 3 जणांचा मृत्यू, 8 जण जखमी

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात पुन्हा एकदा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी पहाटे ब्रुकलिन परिसरातील क्राउन हाइट्स येथील ‘टेस्ट ऑफ द सिटी लाउंज’ या रेस्टॉरंटमध्ये झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले आहेत. न्यूयॉर्क शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गोळीबार पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास घडला.

न्यूयॉर्क पोलीस आयुक्त जेसिका टिश यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “मृत्यूमुखी पडलेले तिन्ही व्यक्ती पुरुष होते. यापैकी दोघांचे वय 27 आणि 35 वर्षे आहे, तर तिसऱ्या व्यक्तीच्या वयाबाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही. घटनास्थळावरून 36 हून अधिक काडतुसांचे खोके सापडले आहेत, ज्यावरून कमीत कमी 36 गोळ्या झाडल्या गेल्याचे स्पष्ट होते.”

टिश यांनी सांगितले की, “या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही आणि संशयितांची ओळख पटलेली नाही. आज पहाटे घडलेली घटना अत्यंत भयानक आहे. या गोळीबारामागील कारण आणि दोषी कोण आहे, याचा तपास आम्ही करत आहोत.” दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाला लेव्हल 1 मोबिलायझेशन अंतर्गत बंद केले असून, तपास सुरू आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.