स्कॉर्पिओ-मोटारसायकल अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, गंगापूर-वैजापूर रोडवरील वरखेड येथील घटना

गंगापूर-वैजापूर रोडवरील वरखेडजवळ स्कॉर्पिओने मोटारसायकलला समोरासमोर धडक दिल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सजन राजू राजपूत (२८, ह.मु. वाळूज, सटाणा, वैजापूर) हे पत्नी शीतल सजन राजपूत (२५) व मुलगा कृष्णांश (१) हे सटाणा येथून वाळूजकडे जात होते.

सोमवारी सकाळी ८ वाजता मोटारसायकलला (एमएच २० सीक्यू ० ७६६) वरखेड पाटीजवळ समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉ र्पिओने (एम.एच.१९ बी. यू.४२१४) समोरासमोर जोरदार धडक दिली. मोटारसायकलने जाणारे तिघेही हवेत फेकले गेले व रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात पडले.

घटनेची माहिती मिळताच १०८ च्या रुग्णवाहिकेतून जखमींना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल सूर्यवंशी आणि डॉ. मुजम्मिल शेख यांनी तपासून तिघांनाही मृत घोषित केले. घटनेची महिती मिळताच शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे बीट जमादार विनोद बिघोत यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

दोन्ही अपघातग्रस्त वाहने पोलीस ठाण्यात जमा केली असून, पुढील तपास शिल्लेगाव पोलीस करीत आहेत. दाम्पत्य व चिमुकल्याचा अपघातात मृत्यू झाल्याने गंगापूर व वैजापूर तालुक्यांत हळहळ व्यक्त केली जात आहे.