
खासगी लाईफ इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करत सायबर चोरट्याने एकाला लॉकडाउन असल्याचे सांगत बँकेतून वार्षिंक इसीएसद्वारे हप्ता कमी होणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर लिंक पाठवून परस्पर 2 लाख 97 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. याप्रकरणी 56 वर्षांच्या नागरिकाने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पाषाण परिसरात राहायला आहेत. 17 जुलैला त्यांना सायबर चोरट्याने फोन करून लाईफ इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. लॉकडाउन असल्यामुळे बॅक खात्यातून इसीएस वार्षिक हप्ता कमी होणार नसल्याची बतावणी केली. त्यामुळे तक्रारदाराने सायबर चोरट्याकडून माहिती घेतली असता, त्याने लिंक पाठविली. संबंधित लिंकवर क्लिक करण्यास सांगून सायबर चोरट्याने त्यांच्या बँक खात्यातून 2 लाख 97 हजार रूपये ऑनलाईन स्वतःच्या बॅक खात्यात वर्ग करत फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विजयकुमार लांबतुरे अधिक तपास करीत आहेत.

























































