विजेच्या समस्या सोडवण्यासाठी तीन आमदारांचे उपोषणास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड 

एकीकडे दुष्काळाचे भयानक सावट त्यात वीज वितरण कंपनीच्या विद्युत रोहित्रांची कमी संख्या व जळाल्यानंतर त्याची होत नसलेली दुरुस्ती यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. रोहित्रांची दुरुस्ती करणे त्यांना योग्य ते साहित्य उपलब्ध करुन देणे व शेतकर्‍यांच्या हक्काच्या मागण्या पूर्ण करणे यासाठी आज शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील, आमदार सुभाष साबणे, आमदार नागेश पाटील यांनी शेकडो शिवसैनिकांसह विज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत आमदार सुभाष साबणे, आमदार हेमंत पाटील, आमदार नागेश पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्युत रोहित्रांच्या त्रुटीसंदर्भात व त्यांची संख्या कमी असल्याबद्दल आवाज उठविला होता. विद्युत रोहित्र जळाल्यानंतर त्यासाठी लागणारे ऑईल व दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य हे नांदेड वीज वितरण मंडळाकडे वेळेवर उपलब्ध होत नाही. यासाठी आवश्यक तेवढा निधी देखील त्यांच्याकडे नाही. यामुळे ग्रामीण भागातील जनता प्रचंड त्रस्त झाली आहे.

एकीकडे प्रचंड दुष्काळाचे सावट, रब्बी हंगामासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याची स्थिती या बाबी लक्षात घेता हे पाणी विहिरीतून कसे उचलायचे हा प्रश्न शेतकर्‍यांसमोर आहे. महिनोमहिने डिपीची दुरुस्ती होत नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील विद्युत पुरवठ्याचा व विहिरीतील पाणी उपश्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे पिके वाळून जात आहेत. पर्यायाने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भयावह बनला आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करुन सुध्दा तसेच वरिष्ठांना विनंती करुन सुध्दा शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची अवस्था घर का ना घाट का अशी झाली आहे. अशा भावना यावेळी तिन्ही आमदारांनी व्यक्त केल्या.

आमदार हेमंत पाटील, आमदार सुभाष साबणे, आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी यावेळी केलेल्या घणाघाती भाषणात वीज वितरण कंपनीचा खरपूस समाचार घेतला. दिशाभूल करणारी उत्तरे, आणि साधनसामुग्रीची कमतरता यामुळे नेमके काय चालले आहे, हे कळायलाच मार्ग नाही. लोडशेडींग होत आहे किंवा नाही याचेही उत्तर प्रशासनाकडून मिळत नाही. खरीपात अवेळी झालेला पाऊस त्यामुळे उत्पन्न कमी, त्यातच ऑक्टोबर महिना कोरडा गेल्याने रब्बीची चिंता शेतकर्‍यांना लागली आहे. त्यातच वीज मंडळाचा हा ज्वलंत प्रश्न व प्रशासनाकडून शेतकर्‍यांची होणारी गळचेपी थांबविण्यासाठी आम्ही हे उपोषण सुरु केले आहे.

कालबध्द कार्यक्रमात किंवा किती तारखेपर्यंत हे काम पूर्ण होणार याची शाश्वती मिळेपर्यंत आपले हे उपोषण सुरुच राहणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. याप्रसंगी शिवसेनेचे नांदेड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपोषणात सहभागी झाले होते. जय भवानी जय शिवाजीच्या गजराने तसेच वीज वितरण कंपनी हाय हाय, शेतकर्‍यांची दिशाभूल करणार्‍या वीज मंडळाचा निषेध असो या घोषणांनी अण्णाभाऊ साठे चौक परिसर दणाणून गेला होता.