
हॉटेल व्यवसायात नुकसान झाल्यामुळे आर्थिक चणचण भागविण्यासाठी एसटी चालकाला पाटस टोल नाक्याजवळ अडवत पोलीस असल्याची बतावणी करीत कुरियरसह सोन्या-चांदीच्या ऐवजाची ने-आण करणाऱ्या त्रिकुटाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली. त्यांनी चार जणांकडून 1 कोटी 55 लाखांची रोकड लुटल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्याकडून रोख 85 लाख 52 हजार, 7 लाख 50 हजाराचे सोन्याचे दागिने आणि वाहने मिळून 1 कोटी 54 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. रामदास भाऊसाहेब भोसले (वय 30), तुषार बबन तांबे (वय 22, दोघेही रा. वरुडे, शिरूर) आणि भरत शहाजी बांगर (वय 36 रा. गणेगाव खालसा, शिरूर) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली. त्यावेळी गुन्हे पथकाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक राम धोंडगे उपस्थित होते.
लातूरहून मुंबईच्या दिशेने मंगळवारी (दि.3) मध्यरात्रीच्या सुमारास चाललेल्या एसटी चालकाला पोलीस असल्याची बतावणी करत चौघांनी पाटस टोलनाक्याजवळ अडविले. त्यानंतर पासद्वारे प्रवास करणाऱ्या चार प्रवाशांना बाहेर बोलावून घेत चोरट्यांनी एसटी चालकाला पुढे जाण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी संबंधित प्रवाशांना आम्ही पोलीस आहोत. तुमच्याकडील ऐवज चोरीचा असल्याचे सांगत 1 कोटी 12 लाख 37 हजारांचा मुद्देमाल काढून घेत मोटारीतून पळ काढला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाकडून तांत्रिक विश्लेषणासह सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचे काम करण्यात येत होते. त्यानुसार पाटस टोलनाक्यापासून चार किलोमीटर अंतरावर एकजण एसटीतून खाली उतरून पळाल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. त्याच्याविषयी पोलिसांना संशय आल्यामुळे तपासात भोसले भावडांसह साथीदारांनी प्रवाशांची लूट केल्याची माहिती पथकाला मिळाली.
पथकाने सापळा रचून आरोपी रामदास भोसले, तुषार तांबे, भरत बांगर यांना खराडी बायपास परिसरात ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. लूट केल्यानंतर अवघ्या 72 तासांमध्ये पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींनी रक्कम खर्च करण्याआधी त्यांच्याकडून गुन्ह्यातील 1 कोटी 55 हजारांचा ऐवज परत मिळविण्यात यश आल्यामुळे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. लूट केल्यानंतर आरोपींनी रोकड उसाच्या शेतातील विहीरीच्या दगडांमध्ये लपवून ठेवली होती. संबंधित रक्कम, मोटार, दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, एपीआय सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, शब्बीर पठाण, राजू मोमीण, जर्नादन शेळके, अनिक काळे, रविराज कोकरे, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, विजय कांचन, गुरू जाधव, धीरज जाधव, बाळासाहेब खडके, दगडू विरकर, काशीनाथ राजापुरे यांनी केली.
आरोपी लातूरपासून होते प्रवाशांच्या पाळतीवर
कुरियर वाहतूकीसह ऐवजांची ने-आण करणाऱ्या चौघा प्रवाशांच्या मागावर एक आरोपी लातूरपासून होता. त्याने प्रवाशांच्या सर्व हालचाली मोबाइल मेसेजद्वारे साथीदारांना कळवल्या होत्या. त्यानंतर पाटस गावच्या अलीकडे चार किलोमीटरवर संबंधित आरोपी खाली उतरताच पळत गेल्याचे सीसीटीव्हीत दिसले. त्याच्या वागण्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यानुसार खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळत मोठ्या गुन्ह्याची उकल केली आहे.
एसटीतून चार प्रवाशांना खाली उतरवत लूट करणाऱ्या तिघांना पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक कोटीपेक्षा जास्त ऐवज जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, लुटीच्या घटनेमध्ये संबंधित कुरियर कंपनीतील कोणाचा सहभाग आहे काय, यासंदर्भात तपास केला जात आहे. त्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम आढळून आल्यामुळे आयकर विभागालाही माहिती देण्यात येणार आहे.
– डॉ. अभिनव देशुमख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण पोलीस
































































