बिरोबा मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

पारनेर तालुक्यातील कासारे येथील बिरोबा मंदीरातून देवाची चांदीची नागफणी व दानपेटीतील रोख रक्कम चोरणाऱ्या तिघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या टोळीकडून चोरलेली साडेतीन किलो चांदी हस्तगत केली आहे. संतोष एकनाथ बर्डे (वय- 42, रा. कळंब, ता. आंबेगाव, जि- पुणे), गणेश जयराम गांगुर्डे (वय-32, रा. हिवरा कोरडा, ता- पारनेर), मनोज चंद्रकांत उदावंत (वय- 43, रा. म्हस्के गल्ली, लोणी प्रवरा, ता. राहाता) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

दकासारे येथील बिरोबा मंदिराचा दरवाजा अज्ञात चोरट्यांनी तोडून मंदीरातील बिरोबा देवाचा चांदीचा नागफणी व दानपेटीतील रोख रक्कम असा एकूण 3 लाख 2 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. घटनेबाबत मंदीराचे पुजारी रावसाहेब पांडूरंग शिंदे (वय- 44 वर्षे, रा. बिरोबा देवस्थान, कासारे, ता. पारनेर) यांनी पारनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, हा गुन्हा संतोष बर्डे, रा. अकलापूर, ता- संगमनेर याने व त्याचे साथीदाराने मिळून केला आहे. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर येथे जावून मिळालेल्या बातमीनूसार आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हाकळंब (ता- आंबेगांव, जि. पुणे) येथे रहात असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी कळंब, ता- आंबेगांव येथे जावून आरोपीचा शोध घेवून आरोपी संतोष बर्डे यास ताब्यात घेतले. त्याचेकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने साथीदार गणेश गांगुर्डे, (रा. हिवरा कोरडा, ता. पारनेर) असे दोघांनी मिळून केल्याची कबुली दिली. त्यावेळी आरोपीची संतोष बर्डे याची घरझडती घेतली असता घरझडतीमध्ये 1 लाख 46 हजार 160 रुपये किंमतीच्या 3 किलो 654 ग्रॅम वजनाच्या दोन चांदीच्या विटा आढळल्या. आरोपींनी नागफणीचे लोणी प्रवरा येथील सराफ मनोज उदावंत याचेकडून तुकडे करुन वितळवून तयार करुन घेतल्या असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी गणेश गांगुर्डे व सराफ मनोज उदावंत यांचा शोध घेवून मुद्देमालासह अटक केली. आरोपींना पुढील चौकशीसाठी पारनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.