खवल्या मांजराची खवले विक्रीसाठी आणणाऱ्या तीन संशयितांना मुद्देमालासह अटक; एक जण फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंडणगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लाटवण फाट्यावर खवल्या मांजराची खवले विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर मंडणगड पोलीस ठाण्यात वन्यजीव प्राणी संरक्षण अधिनियमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्य़ाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

मंडणगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाटवण दापोली मार्गावर काही संशयीत खवल्या मांजराची शिकार करून त्याची खवले विक्रीसाठी येत असल्याच्या गोपनीय माहीतीवरून मंडणगड व खेड पोलीसांनी लाटवण फाट्यावर सापळा रचला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक हर्षल हिंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत तीव जणांना ताब्यात घेण्यात आले. हे तिन्ही संशयित आरोपी दुचाकीवरून आले होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना अडवून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडील पिशवीमध्ये 4372 किलो वजनाचे खवल्या मांजराची खवळे आढळून आली.

या तीन संशयीत आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांची दुचाकी जप्त केली आहे. त्यांच्यासोबत असलेला एकजण चारचाकी वाहन घेऊन आला होता. पोलिसाना पाहताच काळोखाचा फायदा घेत तो पसार झाला. पसार झालेल्याचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी मंडणगड पोलीस अधिक तपास करीत आहे.