आरोग्यसेविकांच्या वेतनात तीन हजारांची वाढ, मुंबई महापालिका प्रशासनाचा निर्णय  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी यासह इतर मागण्यांबाबत मुंबई महापालिकेने सकारात्मक भूमिका घेत चार हजार आरोग्यसेविकांच्या वेतनात तीन हजारांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ऍड. प्रकाश देवदास यांनी आज दिली.

किमान वेतन, पेन्शन, कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया बंद करणे इत्यादी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबई महापालिकेच्या चार हजार आरोग्य सेविकांनी 1 जूनपासून आंदोलनाचे हत्यार उपसले होते. आंदोलनानंतर तिसऱया दिवशी संघटनेशी चर्चा केल्यावर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यानुसार दोन हजार रुपये तत्काळ वेतनवाढ देण्यात येणार आहे, तर एप्रिल 2023 पासून एक हजार वेतनवाढ देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आयकरासाठी टीडीएस कापले जाणार नाही, किमान वेतन 15 हजार 581 आहे त्यापैकी 12 हजार दिल्यानंतर 3 हजार 581 पुढे तीन वर्षांत देण्यासाठी संघटनेशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.

भाऊबीज भेट देण्याबाबत निर्णय घेणार

2016 साली नेमणूक झालेल्या आरोग्यसेविकांना एक दिवसाचा ब्रेक दिला जातो तो पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करणे याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. तसेच 2016 पासून त्यांना भाऊबीज भेट देण्यात यावी याबाबत जून 2022 अखेर चर्चा करून निर्णय घेतले जातील, असे आश्वासन दिल्याचे देवदास यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.