
स्वतःच्या नातवंडासोबत खेळावयास येणाऱ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी नराधम यशवंत बापू नलवडे (वय 51, रा. सावे, ता. शाहूवाडी) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांनी मरेपर्यंत जन्मठेप आणि वेगवेगळ्या कलमांन्वये दंडाची शिक्षा सुनावली.
स्वतःच्या दोन लहान नातवंडांसाठी घरालगत आरोपी यशवंत नलवडे याने साडीचा झोपाळा केला होता. या नातवंडासोबत झोपाळ्यावर खेळण्यासाठी पीडित तीन वर्षांची चिमुरडी येत होती. 28 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी नराधमाने तिला जबरदस्तीने स्वतःच्या घरात नेऊन अमानुषपणे अत्याचार केला. तिच्या अंगाचे चावे घेऊन गंभीर जखमी केले. घाबरलेली चिमुरडी रक्तबंबाळ अवस्थेत रडत घरी आल्यानंतर आईने चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. याचा जाब विचारण्यासाठी पीडितेची आई घराकडे आली असता नराधमाने अंगावर धावून जात त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली. या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली होती. दरम्यान, पीडित बालिकेच्या आईने शाहूवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सरोजिनी चव्हाण यांनी नराधम यशवंत नलावडे याला बेडय़ा ठोकून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांच्यासमोर खटल्याची सुनावणी होऊन 19 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून मरेपर्यंत जन्मठेप आणि दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्या वतीने ऍड. मंजुषा पाटील यांनी काम पाहिले.


























































