
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
बॉलीवूडमध्ये परफेक्शनीस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमीरसाठी ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ डोकेदुखी ठरला आहे. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी या चित्रपटाला नाकारल्यानंतर आता तो लीक झाल्याचे वृत्त आहे.
पायरसीसाठी प्रसिद्ध असलेली वेबसाईट तमिल रॉकर्सवरून चित्रपट अवघ्या काही तासांतच लीक झाल्याची माहिती मिळते. विशेष म्हणजे तीन भाषांमधून HD क्वालिटीचा हा चित्रपट लीक करण्यात आला आहे. काही चाहत्यांनी तमिल फिल्म प्रोड्यूसर्स काऊन्सीलमध्ये तक्रार करून याविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
‘ठग्ज…’च्या आधी सुपरस्टार विजयचा वादग्रस्त चित्रपट ‘सरकार’ देखील या साईटवरून लीक करण्यात आला होता. तक्रार करण्यात आल्यानंतर काऊन्सीलने थिएटर मालकांना आतमध्ये कॅमेरे लावण्यास आणि प्रेक्षकांना मोबाईल फोन घेऊन जाण्यावर बंदी केली होती. मात्र प्रॅक्टीकली शक्य नसल्याचे थिएटर असोसिएशनने म्हटले होते.
आधीच प्रेक्षकांनी ठग्जला नाव ठेवली असून थिएटरवर अन्य चित्रपटांकडे धाव घेतली आहे. आता इंटरनेटवर लीक झाल्याने चित्रपट आणखी मार खाणार असे चित्र आहे. त्यामुळे 240 कोटी रुपये खर्चून बनलेला हा चित्रपट ऐन दिवाळीतच दिवाळं काढणारं असं म्हटलं जात आहे.
























































