
सामना प्रतिनिधी, मुंबई
लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये जनरल तिकिटांसाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा आणि आसने पकडण्यासाठी होणारी धक्काबुक्की यातून आता प्रवाशांची सुटका होणार आहे. अनारक्षित मेल-एक्स्प्रेस गाड्यांची जनरल तिकिटे खरेदी केल्यानंतर प्रवाशांना त्यांच्या अंगठ्याचा ठसा उमटवून ‘बायोमेट्रिक टोकन’ दिले जाणार आहे. गाडी सुटण्यापूर्वी हे टोकन दाखवताच त्यांना बुकिंगच्या वेळेप्रमाणे आसने देण्याची योजना मध्य रेल्वेने आखली आहे. त्यामुळे अतिरेकी कारवायांच्या पार्श्वभूमीवर अनारक्षित गाडय़ांमध्ये होणारी समाजकंटकांची घुसखोरी रोखली जाणार आहे.
अनारक्षित गाडय़ांमध्ये जनरल तिकिटावर प्रवास करताना आसन क्रमांक नसल्याने आरपीएफ कैद्यांप्रमाणे प्रवाशांची रांग लावायचे. अशा रांगांमध्ये प्रवासी जवळच्या बॅगा, गोण्यांमध्ये सामान सांभाळत आपला नंबर येण्याची वाट पाहत तिष्ठत उभे असायचे. त्यात महिला, लहान मुले आणि ज्येष्ठांचे हाल व्हायचे. अशा रांगांमध्ये घुसखोरीलाही वाव असायचा. रेल्वेचा स्टाफही आपल्या माणसांना घुसविण्याचा प्रयत्न करायचा. त्याविरोधात रेल्वे आता हायटेक तंत्रज्ञान वापरणार आहे.
असे असणार तंत्रज्ञान
जनरल तिकिटे घेणाऱ्या प्रवाशांच्या अंगठय़ांचे ठसे घेऊन त्याचे ‘बायोमेट्रिक टोकन’ प्रवाशांना दिले जाणार आहे. एक दिवसापूर्वी हे टोकन घेता येते. प्रवाशांना आता हे टोकन घेऊन रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही. त्यांनी सरळ गाडी सुटण्यापूर्वी टोकन रेल्वे कर्मचाऱ्यांना द्यायचे आणि तिकिटांच्या वेळेप्रमाणे आसने देण्यात येणार आहेत.
लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये दलालांचे रॅकेटही चालत असते. तसेच जनरल तिकिटे काढणारे भलतेच आणि प्रवास करणारे भलतेच असेही व्हायचे. त्यामुळे अशा प्रवाशांचा 60 दिवसांचा अंगठ्यांच्या ठशांचा डाटा साठवला जाणार आहे. त्यामुळे वारंवार येणारे प्रवासी ओळखले जाणार आहेत. शिवाय सराईत गुन्हेगारांचे ठशांच्या डेटामुळे गुन्हेगारांचा माग घेणे सोपे होणार आहे.


























































