
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील शिवणी वनपरिक्षेत्रातर्गत येत असलेल्या नलेश्वर ( मोहाळी ) शेतशिवार नहर परिसरात वाघाने हल्ला करून शेतकऱ्याला ठार केल्याची घटना रात्रीच्या सुमारास समोर आली. मृत शेतकऱ्याचे नाव माणिक जगन नन्नावरे (50) असे आहे. हा शेतकरी दुबार पेरणी पिकाला पाणी देण्यासाठी सायंकाळच्या सुमारास शेतावर गेला असता उशिरापर्यंत घरी न आल्याने शोधाशोध केल्यानंतर छिन्न – विछिन्न अवस्थेत पायाचे लचके तोडलेला मृतदेह नलेश्वर नहर परिसरात आढळून आला. शिवणी वनविभागाला माहीती कळताच मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रूग्णालयात हलविला.
या घटनेने गाव परिसरात खळबळ उडाली, वाघांची दहशत निर्माण झाली असल्याने वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांत केली जात आहे. शिवणी वनपरिक्षेत्रांत एका महिन्यात वाघ हल्ल्याची तिसरी घटना असून वाघाच्या हल्ल्यात दोघांना जीव गमवावा लागला असल्यामुळे नागरिकांत वाघाची दहशत निर्माण झाली आहे. शेती कशी करावी असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. शासन व प्रशासनाने घटनेची दखल घेवून योग्य उपाय योजना आखून वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करित आहे.




























































