सहृय़ाद्रीमधील संवर्धन राखीव वनक्षेत्रामध्ये वाघाचे दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये बुधवारी रात्री वाघाचे छायाचित्रण टिपण्यात आले आहे. सह्याद्रीमधील वनक्षेत्रांना ‘कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’(संवर्धन राखीव)चा दर्जा दिल्यानंतर प्रथमच या भागामध्ये वाघाच्या अस्तित्वाचा छायाचित्रित पुरावा मिळाला आहे. ज्यामुळे व्याघ्र भ्रमणमार्ग सुरक्षित झाल्याचेही दिसून येत आहे.

गेल्या वर्षी राज्य सरकारने सह्याद्रीमधील आठ वनक्षेत्रांना ‘कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’चे संरक्षण दिले होते. यामध्ये साताऱयातील जोर-जांभळी, कोल्हापूरमधील विशालगड, पन्हाळा, गगनबावडा, आजरा-भुदरगड, चंदगड, सिंधुदुर्गमधील आंबोली-दोडामार्ग आणि तिलारीचा कॉन्झर्वेशन रिझर्व्हचा समावेश आहे. या वनपट्टय़ांना संरक्षण दिल्यामुळे सह्याद्रीमधील वन्यजीव आणि खास करून वाघांचा भ्रमणमार्ग सुरक्षित होणार असल्याचे म्हटले जात होते. आता त्यासंबंधीचा पुरावा हाती लागला आहे. वन विभागाने संरक्षित केलेल्या आठ ‘कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’पैकी एका वनक्षेत्रामध्ये वाघाचा वावर आढळून आला आहे.

वाघाच्या वावराची माहिती मिळाल्यानंतर वन कर्मचाऱयांनी एका ‘कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’मध्ये कॅमेरा ट्रप लावले होते. या कॅमेरा ट्रपमध्ये बुधवारी रात्री नर वाघाचे छायाचित्र आल्याची माहिती कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही बेन क्लेमंट यांनी माहिती दिली.

वाघाचे छायाचित्र हे त्याने केलेल्या शिकारीबरोबर टिपले गेले आहे. महत्त्वाचे म्हणजे सह्याद्रीत आठ ‘कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’च्या निर्मितीमुळे वाघांचा भ्रमणमार्ग जोडला जाऊन त्याठिकाणी वाघांचा संचार सुरू असल्याचे उघड झाला आहे.

– डॉ. व्ही. बेन क्लेमंट, मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर.