
यवतमाळ जिह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून एक वाघ धाराशिवमार्गे सोलापूर जिह्यातील बार्शी तालुक्यात आला आहे. पाचशे किलोमीटर दूर अंतर चालून बार्शीमध्ये आलेल्या या वाघाला जेरबंद करून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार आहे. सोलापूरच्या वन विभागाने यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी सरकारकडे पाठवला आहे.
टिपेश्वर अभयारण्यातून आलेला हा वाघ गेल्या शनिवारपासून बार्शी तालुक्यात वास्तव्यास होता. शुक्रवारी हा वाघ पुन्हा धाराशिव जिह्यात दिसून आला. या वाघावर नजर ठेवण्यासाठी वन विभागाने ठिकठिकाणी सापळा व कॅमेरे लावले आहेत. सुरुवातीला येडशी, रामलिंग अभयारण्य परिसरातील गावांच्या शिवारात आढळून आलेला वाघ नंतर नागरी वस्ती असलेल्या कारी, नारी भागांतही गावकऱ्यांच्या नजरेस पडला. जर जनावरांची शिकार सापडली नाही, तर वाघ मानवी वस्त्यांमध्ये हल्ला करण्याचा धोका आहे.
या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या वन विभागाने या वाघाला जेरबंद करून आणि त्यास रेडिओ कॉलर करून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यासाठी प्रस्ताव तयार करून शासनाला पाठविला आहे. उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक यांनी याबाबतची माहिती दिली. हा प्रस्ताव पुण्याच्या कार्यालयास पाठवण्यात आला आहे. त्यास अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर तज्ञांचा चमू बार्शी व येडशी परिसरात वाघाच्या वास्तव्याच्या परिसरात येऊन त्याचा शोध घेईल आणि त्याला पकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार आहे.
बार्शी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचाही वावर आहे. त्यातच आता वाघाची भर पडल्यामुळे बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी, घोळवेवाडी, चिंचोळी, पांढरी, कारी, नारी आदी 14 गावांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. गेल्या सात-आठ दिवसांत वाघाने काही जनावरांवर हल्ले करून शिकार केली. नागरी वस्त्यांच्या भागात आल्यामुळे मानवाला धोका निर्माण झाला आहे. जर जनावरांची शिकार सापडली नाही, तर वाघ मानवी वस्त्यांमध्ये हल्ला करू शकतो.






























































