Video – चंद्रपुरात वाढली वाघांची संख्या, नसबंदी करण्याचा वनविभागाचा विचार

1113

देशाची लोकसंख्या वाढाल लागली होती तेव्हा सरकारने कुटुंब नियोजनाची संकल्पना राबवली होती. आता हीच संकल्पना वाघांच्या संदर्भात राबवण्याचा विचार केला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या वाढत असल्याने त्यांची नसबंदी करण्याचा विचार वनविभाग करीत आहे. हा विचार अजब वाटत असला तरी, तो उद्या होणाऱ्या राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाच्या बैठकीत चर्चेला येणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचं नाव येताच डोळ्यासमोर येतात ते पट्टेदार वाघ. जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि संपन्न असं घनदाट जंगल, ही या जिल्ह्याची ओळख. आता याच जंगलात 300 हून अधिक वाघ मुक्तपणे वावरत आहेत. आता या वाघांना जंगल अपुरे पडू लागल्यानं ते गावाशेजारी येऊ लागले आणि त्यातून मानव-वन्यजीव संघर्ष सुरू झाला. या वर्षात आतापर्यंत 11 जणांचे बळी वाघाने घेतले आहेत. वाघांची संख्या वाढू लागल्यानं हा संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. त्यामुळे यावरचा उपाय शोधला जात आहे. उद्या शुक्रवारी  राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात विविध उपायांवर चर्चा होणार आहे. त्यातील एक उपाय वाघांच्या नसबंदीचाही आहे. नसबंदी केल्यास प्रजनन थांबेल आणि संघर्ष कमी करण्यास मदत होईल, असा अजब तर्क लावला जात आहे.

या जिल्ह्यात वाघांचा मृत्युदर फारच नगण्य आहे. वाघांच्या प्रजननासाठी जिल्ह्यातील वातावरण अतिशय पोषक आहे. त्यामुळे इथे त्यांची संख्या वाढीव आहे. हे आशादायी चित्र असताना नसबंदी करून त्यावर कृत्रिम आळा घालण्याची सद्बुध्दी कुठून आली, हे नवलच आहे. पूर्वी जिल्ह्यातून पन्नास हून अधिक वाघांच्या स्थानांतरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. हाही विषय बैठकीत मांडला जात आहे. मात्र नसबंदीचा विषय बैठकीच्या अजेंड्यावर आणताना त्याचा कोणताही अभ्यास केला गेलेला नाही. बैठकीला आमंत्रित सदस्यांनाही याची फार कल्पना नाही. त्यामुळं हा प्रयोग किती यशस्वी होतो, हे सांगणं अवघड झालं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या