
सामना प्रतिनिधी । चंद्रपूर
चंद्रपूर वनपरिक्षेत्रात एका वाघिणीला पाच बछडे झाले आहे, ही बाब अतिशय दुर्मिळ समजली जाते. विशेष म्हणजे या वाघिणीने या बछड्यांना गावाच्या अतिशय जवळील भागात जन्म दिला होता. त्यामुळे वनविभागाने अतिशय गुप्तता बाळगली होती. वाघीण आणि बछडे उन्हाळ्यात गावाच्या जवळ येऊ नये म्हणून वनविभागाने या भागात कृत्रिम पाणवठा तयार केला होता. सध्या हे सर्व बछडे सुरक्षित असून 10 ते 12 महिन्यांचे आहेत. बारमाही नद्या, उत्तम भक्ष्य आणि संपन्न जंगल म्हणजे चंद्रपूर अशी चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. वाघिणीने पाच बछड्यांना जन्म दिल्याने हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. सध्या वाघ आणि वन्यजीव यांच्याबाबत सर्वत्र चर्चेचा विषय असताना या वाघीण आणि बछड्यांचा थांगपत्ता लागू न देता त्यांची देखभाल करणे व विभागापुढचे मोठे आव्हान होते. यात विभाग यशस्वी झाला असून जिल्ह्याचा व्याघ्र श्रीमंतीत यामुळे मोठी भर पडली आहे.

































































