जगप्रसिद्ध ‘टाइम मॅगझिन’ची 19 कोटी डॉलरला विक्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जगप्रसिद्ध टाइम मॅगझिन 19 कोटी डॉलर्सला विकण्यात आले आहे. अमेरिकेच्या मेरेडीथ कॉर्प कंपनीने टाइम मॅगझिनचे हक्क सेल्सफोर्सचे सहसंस्थापक मार्क बेनीऑफ आणि त्यांच्या पत्नीला विकले आहे. विक्री प्रक्रिया येत्या 30 दिवसांत पूर्ण होणार आहे.

मेरेडीथ कॉर्पच्या घोषणेनुसार टाइम मॅगझिन विकण्यात आले असले तरी पत्रकारितेशी निगडित लेखन किंवा  दैनंदिन निर्णयात  नवे मालक मार्क बेनीऑफ यांचा हस्तक्षेप नसेल. त्याबाबतचे सर्व निर्णय टाइम मॅगझिनचे सध्याचे कार्यकारी मंडळ घेईल, असे मेरेडीथ कॉर्पने स्पष्ट केले आहे.

सेल्सफोर्स ही क्लाऊड कंम्युटिंग क्षेत्रातील अग्रणीय कंपनी आहे. मेरेडीथ कॉर्प कंपनीतर्फे पीपल आणि बेटर होम अँड गार्डनसारखी मासिके प्रकाशित केली जातात. मेरेडीथ कॉर्प कंपनीने टाइम मॅगझिनच्या विक्रीची बोलणी मार्चपासून सुरू होती. यानंतर फॉर्च्युन, मनी आणि स्पोर्टस् इलस्ट्रेटेड यांच्या विक्रीसंदर्भातही बोलणी सुरू आहेत.