पाऊस आणि साडी

>> पूजा तावरे

साडी.. एक सर्वांगसुंदर पोशाख. कोणत्याही ऋतूत परिधान करावा. पावसात थोडी काळजी घेतली तर मस्त रंगाच्या साड्या नेसण्यासारखा आनंद काही वेगळाच.

सध्या पावसाने मस्त वर्दी दिली आहे. पावसाळा म्हटलं की आठवण होते कांदा भजी, चहा, हवेतला गारवा, दाट धुकं आणि रंगीबेरंगी छत्र्या नी रेनकोटस… बरं यातही पावसाळ्यात साड्यांसाठी असणारा मान्सून सेल म्हणजे महिलांसाठी एक पर्वणीच असते. त्यामुळे पाऊस, स्त्रिया आणि साडी हे एक अजब समीकरण आहे. साडी एक असा आउटफिट आहे ज्यामध्ये प्रत्येक स्त्री अत्यंत सुंदर अन् स्टायलिश दिसते. ज्यांना आरामदायक हवं असतं, ते नेहमी सीझनप्रमाणे साड्यांची निवड करतात. पावसाळ्यातही योग्य साडीची निवड केली तर मान्सूनची मजाच वेगळी येते.

सिल्क साडी

सिल्क हा अत्यंत उत्तम कापडाचा प्रकार आहे. यात सोनेरी झळाळी असते. यामध्ये क्रेप सिल्क,आर्ट सिल्क, कॉटन मिक्स किंवा टस्सर सिल्क वापरू शकता. मात्र पावसाळ्यात सिल्कच्या साड्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.याबरोबरच आता वैशिष्टय़पूर्ण काठाच्या लिनन साड्या सणसमारंभातही मोठ्या प्रमाणात दिसू लागल्या आहेत. दिसायला भरजरी, पण वजनाने हलक्या आणि पावसाळ्यात पटकन वाळणाऱ्या या साड्यांना म्हणूनच वाढती पसंती मिळत आहे. लवकर सुकणाऱ्या व दिसायला सुंदर अशा कॉटन साड्याही वापरायला हरकत नाही. पावसाळ्यात बॅकलेस डिझाइन ब्लाऊजसह साडी वापरू शकता. लग्न-समारंभात  ब्रायडल डिझाइन गोल्डन एम्ब्राईडरी वर्क असणाऱ्या साड्या वापरू शकता. फॉर्मल डिझाइनसाठी शक्यतो कॉटन साडी हा उत्तम उपाय आहे. याबरोबरच फ्लोरल प्रिटिंग असणाऱ्या साड्यादेखील पावसाळ्यासाठी उत्तम पर्याय आहे.

 जार्जेट किंवा शिफॉन

शिफॉनची पातळ साडी खरोखर पावसाळ्यात छानच दिसते. ती ओली झाली तरी वाळतेही लगेच. दैनंदिन वापरासाठी या अत्यंत योग्य साड्या आहेत. पण या साड्या फार पारदर्शी असतात.

गोल्डन बॉर्डर

हेवी वर्कच्या साड्या वापरायला आवडत नसेल तर सिंपल गोल्डन बॉर्डर असणाऱ्या शिफॉन आणि जॉर्जेटच्या साड्या आकर्षक दिसतात. या पावसात वापरायला अत्यंत आरामदायी आहेत. यामध्ये ट्रेडिशनल विथ निऑन रंगाची साडीदेखील उठून दिसेल. याबरोबरच बांधणी आणि लहरिया प्रकारातील साड्यादेखील पावसाळ्यात एक उत्तम असा पर्याय आहे.

नायलॉन किंवा सिन्थेटिक

या साड्या पावसाळी सीझनसाठी उपयुक्त आणि आरामदायक आहेत. हे कापड पाणी टिकू देत नसून लवकर वाळतं.

कलर्स ऑफ मान्सून

प्रत्येक ऋतू काही रंग घेऊन येतो. यंदाच्या पावसाळ्यात ब्ल्यू, ग्रीन, ऑरेंज, पिंक. पर्पल, ग्रीन, यलो या रंगांना विशेष मागणी आहे. शिफॉन, जॉर्जेट, पूनम  साड्या नेसाव्यात. त्यातही लेमन यलो, लाइट ग्रीन, मँगो हे रंग खूपच छान दिसतात.

पाऊस, साडी आणि गाणी

‘प्यार हुआ इकरार हुआ’पासून ते ‘मौसम की बारिश’पर्यंत बॉलीवूड आणि पावसाचं नातं जुनच आहे. काळानुसार बॉलीवूडमध्ये पाऊस किंवा त्यावरील चित्रित गाणी वेगळ्या पद्धतीने सादर झाली. मात्र त्यात एक गोष्ट कायम राहिली ती म्हणजे साडी. चित्रपटांमध्येही पिवळ्या, निळ्या आणि ऑरेंज अशा साडय़ांवर अभिनेत्री पाहायला मिळतात.. ‘आज रपट जइय्यो…’, ‘झुबी झुबी झुबी…’, ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्यांतून शिफॉनच्या साडीची क्रेझ पाहायला मिळते.

लेखिका फॅशन डिझायनर आहेत.