
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (टीस) या नामांकित संस्थेत एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्या प्रकरणी तेथील प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत तांबे (24) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो राहत असलेल्या इमारतीच्या 8 व्या मजल्यावरून उडी मारून त्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने ‘टीस’ मधील प्राध्यापक पी विजयकुमार यांच्या सततच्या अपमानास्पद वागणूक आणि टोमण्यांमुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.
सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पवईतल्या कॉस्मो पॉलिटीन सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला संकेतचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता, त्याने इमारतीच्या 8 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी संकेतने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून त्यात त्याने प्राध्यापक पी विजयकुमार यांना आत्महत्येस जबाबदार धरले आहे. माझ्याकडे नोकरी नसल्यामुळे प्राध्यापक विजयकुमार सतत टोमणे मारून अपमान करत असल्याचे त्याने चिठ्ठीत नमूद केले आहे. त्यामुळे पवई पोलिसांनी प्राध्यापक विजयकुमार यांच्या विरूद्ध संकेतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
संकेत हा अतिशय हुषार मुलगा असून तो कायदे विभाग आणि अभियांत्रिकी पदवीधर होता अशी माहिती त्याच्या एका मित्राने दिली. ऑक्टोंबर महिन्याच्या मध्यावधीनंतर तो कॉलेजला यायचा बंद झाला होता. तर टीसमधील एका अधिकाऱ्याच्यामते संकेतने पहिल्या सत्रानंतर इन्सटीट्युट सोडले होते असा दावा केला आहे. संकेतचा मृत्यू ही दुर्दैवाची गोष्ट असल्याचे सांगत इन्स्टिट्यूटकडून तपासयंत्रणेला पूर्ण सहकार्य केले जाईल असे म्हटले आहे.


























































