तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनु सेन निलंबित; मंत्र्यांकडील कागदपत्रे हिसकावल्याप्रकरणी कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशी पेगॅसस प्रकरणामुळे राज्यसभेत गोंधळ झाला. त्यामुळे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. तर तृणूल काँग्रेसचे खासदार शांतनु सेन यांना अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आले आहे.

तृणमूलचे खासदार शांतनु सेन यांनी गुरुवारी कामकाजादरम्यान माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हातातील कागदपत्रे हिसकावत ती फाडून हवत भिरकावली होती. या प्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री वैष्ण त्यावेळी पेगॅसिस प्रकरण आणि विरोधकांनी त्याबाबत केलेल्या आरोपांवर उत्तर देत होते. त्यावेळी सेन यांनी त्यांची कागदपत्रे हिसकावत ती फाडून हवेत भिरकवली होती.

सेन यांना अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आल्याने ते आता अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होऊ शकणार नाहीत. त्यांचे निलंबन करण्यात आल्यानंतर सभापतींनी त्यांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. राज्यसभेत सरकारकडून शांतनु सेन यांना अधिवेशन काळात कामकाजात सहभागी होऊ देऊ नेय, असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावर सभापतींना सेन यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

या घटनेमुळे चर्चेत आलेले शांतनु सेन व्यवसायाने डॉक्टर असून ते इंडियन मेडिकल असोशिएशनचे अध्यक्षही होते. ते उत्तर कोलकातामधील आहेत. 2016 मध्ये तृणमूल काँग्रसकडून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर तृणमूल काँग्रेसने त्यांना राज्यसभेत पाठवले होते. याआधी कोणत्याही प्रकरणात त्यांचे नाव आले नाही. तसेच ते नेहमी शांत असतात. मात्र, आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने ते चर्चेत आले आहेत.