आगमनाची पूर्वतयारी

बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. या कौतुकाच्या पाहुण्याच्या आगतस्वागताच्या तयारीची जबाबदारी अर्थात घरच्या गृहिणीवर असते. आजची स्त्री घरीदारी सारखीच कार्यरत असते. अशावेळी या सगळ्या तयारीचे, पैपाहुण्यांचे नियोजन करावे यासाठी श्रीमतीची थोडीशी मदत…

सणासुदीपूर्वीची तयारी

 • सगळ्यात आधी सामानांची आणि कामांची लिस्ट करून घ्यावी.
 • नोकरीला जात असलेल्या स्त्रियांनी या कामाचे त्यांच्या वेळेनुसार नियोजन करून घ्यावे.
 • सणाच्या काळात अनेक ऑफर्स असतात. त्याचा फायदा घेऊन आवश्यक त्याच गोष्टी शक्यतो घ्या.
 • फर्निचर जुने झाले असेल तर नवीन विकत घेण्यापेक्षा त्याला पॉलिश करणे जास्त सापे पडेल आणि खर्चही वाचेल.
 • काचेवर डाग पडले असतील तर काच थोडीशी ओली करून वर्तमानपत्राने पुसून घ्यावी. काच चकाचक होते.

स्वतःसाठी वेळ काढा

 • गणेशोत्सवात कोणत्या साड्या नेसायचे आहे, त्या एकत्र ठेवा.
 • दोन दिवस आधीच पार्लरमध्ये जाऊन ट्रिटमेण्ट करा.
 • साड्यांवर कोणते दागिने घालायचे तेही हाताशी काढून ठेवलेले बरे म्हणजे ऐनवेळी गोंधळ होत नाही.
 • कामाच्या गडबडीत खाण्याकडे दुर्लक्ष करू नका.
 • या दिवसात जिमला जायला न मिळाल्यास घरच्या घरी व्यायाम करा. म्हणजे उत्साह राहील.

आकर्षक सजावट

 • घराच्या उंबर्‍यावर आकर्षक रांगोळी काढा.
 • दारावर सुंदर लोकरीचे तोरण लावा.
 • घरात टेबलावर छान फुलांनी भरलेला फ्लॉवर पॉट ठेवावा.
 • फ्लॉवर पॉट एका कॉर्नरला ठेकून त्यात खरी किंवा खोटी फुले ठेवावी. त्याने घराची शोभा वाढण्यास मदत होते.
 • सिल्कच्या, काठ पदराच्या साड्या, वापरात नसलेल्या ओढण्या, पडदे होऊ शकतात. त्याचबरोबर बेडशिट, पिलो कव्हर्स, कुशन कव्हर्स यासाठी वापर करता येतो.
 • तसेच सजावटीसाठी पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करावा.

साफसफाई

 • सण-उत्सवांच्या काही दिवस आधी थोडे-थोडे साफ करायला घ्या. म्हणजे नंतर त्याचा त्रास होणार नाही. जसे एक दिवस घराची झाडलोट, दुसर्‍या दिवशी भांडी, नंतर लादी, कपड्यांची आवराआवर असे नियोजन करून ठेवा.
 • सिंकवर डाग असल्यास गरम पाण्यात सोडा आणि साबण एकत्र करून सिंक साफ करायचे. स्वच्छ होईल.
 • किचनच्या भिंत अनेकदा तेलकट होते. तो तेलकटपणा घालवण्यासाठी गरम पाण्यात बेकिंग सोडा लावून ठेवावा. नंतर घासल्यावर घाण निघून जातात.
 • शॅम्पूचे पाणी करून स्पंजच्या मदतीने एक्झॉस्ट फॅन, स्विच बोर्ड स्वच्छ करावेत.
 • किचन किंवा बाथरूमच्या टाईल्सवर डाग जमा झाले असल्यास दोन कप गरम पाण्यात दोन कप व्हाईट व्हिनेगर एकत्र करून ते टाईल्सवर अर्धातास टूथब्रशच्या मदतीने लावून ठेवायचे. नंतर पाण्याने धुऊन टाका. टाईल्स चककाचक दिसतील.

स्वयंपाकघर

 • सणासुदीच्या काळात घरी बरेच पाहुणे येत असतात. अशा वेळी आवश्यक जास्तीची ताटे, ग्लास, वाट्या बाजूला काढून ठेवाव्यात. त्यामुळे ऐनवेळी घरी पाहुणे आल्यावर शोधण्यात वेळ जाणार आहे.
 • नेहमीच्या वापरातील साहित्य हाताजवळच ठेवा.
 • पाहुण्यांना फराळात काय द्यायचे याची आखणी करा.
 • जेवणाचा गोंधळ होऊ नये यासाठी प्रत्येक दिवशी काय आणि कोणते पदार्थ बनवायचे याचे नियोजन करा. म्हणजे जेवण काय बनवायचे असा प्रश्न पडणार नाही.

घरासाठी पडदे निवडताना

 • पडद्याचे कापड चांगले राहण्यासाठी त्याला अस्तर लावावे. म्हणजे ते पडदे जास्त दिवस टिकतात.
 • घराला रंगाला शोभेल अशीच रंगसंगती निवडावी. त्याने घराला आणखी चांगला लूक येतो.
 • पडदे हे शक्यतो गडद रंगाचे असावेत.
 • पडदे विकत घेण्यापूर्वी खिडकी आणि दाराची मापे घेऊन जा. म्हणजे पडदा लहान मोठा होणार नाही.
 • शक्यतो कॉटनचे पडदे घेतल्यास ते जास्त काळ टिकतात.
 • पडद्याचे एक-दोन सेट करून ठेवावेत. सण-उत्सवाच्या वेळी दुसरे धुतलेले पडदे लावावेत.

घराला रंगकाम करताना

 • सगळ्यात आधी कोणता रंग लावायचा याची निवड करा. तो चांगल्या कंपनीचा असेल तर ठीक.
 • उरलेला रंग टाकून न देता जपून ठेवावा, म्हणजे कुठे टच-अपचे काम लागले तर तो वापरता येईल.
 • रंगकामाचा शेजार्‍यांना त्रास होऊ नये यासाठी त्यांना त्याबाबत आधीच कामाची कल्पना देऊन ठेवा.
 • रंगकाम सुरू असेल तेव्हा घराची दारे-खिडक्या उघडी ठेवा व पंखे सुरू ठेवा.
 • घराला फिकट रंग द्यावा. फिकट रंगाने प्रकाश जास्त परावर्तित होतो व खोली आणि मोठी वाटते.
 • बेडरूममध्ये भडक रंग वापरू नये. तिथे शांततेचा फिल देणारे रंग वापरावेत.