
मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने नवीन पाऊल उचलले आहे. अपघात रोखण्यासाठी प्रवाशांमध्ये सुरक्षेच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. मुंबई शहरातील जवळपास 250 चित्रपटगृहांमध्ये ‘छोटा भीम’च्या ऑनिमेटेड व्हिडिओच्या माध्यमातून सुरक्षित प्रवासाबाबत संदेश देण्यात येत आहे.
उपनगरीय रेल्वे मार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या विविध कृत्यांना आळा घालण्याच्या अनुषंगाने पश्चिम रेल्वे प्रशासनाने चित्रपटगृहांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांना प्रभावीपणे संदेश देण्यासाठी लोकप्रिय कार्टून ‘छोटा भीम’चा उपयोग करण्यात येत आहे. चित्रपटगृहांमध्ये शो सुरू होण्याआधी तसेच मध्यांतरादरम्यान ‘छोटा भीम’चा ऑनिमेटेड व्हिडिओ दाखवण्यात येत आहे. मुलांमध्ये कमी वयातच रेल्वे प्रवास सुरक्षेचे नियम पाळण्याची सवय निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू असल्याचे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले. उपनगरीय रेल्वे मार्गावर मागील दहा वर्षांत 26,547 लोकांचा अपघाती मृत्यू झाला आहे. अपघाती बळींची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी जनजागृती उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


























































