साथीचे आजार रोखण्यासाठी अंबरनाथ नगर परिषद ‘इन ऍक्शन’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अंबरनाथ

मुसळधार पावसामुळे अंबरनाथभोवती घट्ट होत चाललेल्या साथीच्या आजारांचा फेरा रोखण्यासाठी नगर परिषद ‘इन ऍक्शन’ झाली आहे. संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम उघडण्यासोबत नगर परिषदेने आजपासून  तीन दिवसीय वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले आहे. त्यासाठी तज्ञ डॉक्टरांची फौजच तैनात ठेवण्यात आली असून मोफत वैद्यकीय तपासणी यावेळी करण्यात येणार आहे.

गेल्या पंधरा दिवसांत जोरदार पाऊस झाल्याने अंबरनाथच्या काही सखल भागात पाणी साचले होते. काही भागात पूरसदृश परिस्थितीमुळे नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. अजूनही अनेक ठिकाणी पुराचे पाणी तसेच असून त्यामुळे साथीचे आजार वेगात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा मनीषा काळेकर यांनी तातडीने बैठक बोलाकून खबरदारी म्हणून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्याबाबत निर्णय घेतला. त्यानुसार नगर परिषदेने गुरुवारपासून तीन दिवसीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. आज पहिल्या दिवशी अंबरनाथच्या छाया रुग्णालयात सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेदरम्यान झालेल्या आरोग्य  शिबिरात शेकडो अंबरनाथकरांनी वैद्यकीय तपासणी करून घेतली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

पूरग्रस्तांना तत्काळ मदत द्या!

 अंबरनाथ पश्चिमेतील अनेक भागामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे.  बाधित झालेली घरे व दुकानांची पाहणी केल्यानंतर यांचा पंचनामा करून तत्काळ मदत मिळवून देण्याबाबतच्या सूचना आमदार डॉ. बालाजी विणीकर यांनी तहसीलदार जयराज देशमुख यांना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने गुरुवारी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्यासह तहसीलदारांची भेट घेतली असता पूरग्रस्तांना लवकरच योग्य नुकसानभरपाई दिली जाणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.यावेळी उपशहरप्रमुख पुरुषोत्तम उगले, निवासी नायब तहसीलदार संभाजी शेलार आदी उपस्थित होते.

  •  उद्या शुक्रवारी तोरणा गेस्ट हाऊस, हुतात्मा चौक व कडकली भाजी मार्केट या दोन ठिकाणी वैद्यकीय शिबीर होणार आहे.
  •  शनिवारी 3 ऑगस्ट रोजी खुंटवली बहुभाषिक शाळेत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

खबरदारी म्हणून अंबरनाथकरांनी या शिबिरात आपली वैद्यकीय चाचणी विनामूल्य करून घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्षा मनीषा काळेकर यांनी केले आहे.