
मराठी, मुंबई, महाराष्ट्र वाचवण्यासाठी आपल्याला महापालिका हवी आहे. आज जर चुकलात तर कायमचे मुकलात, असं महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत. शिवसेना-‘मनसे’-राष्ट्रवादी युतीची प्रचंड जाहीर सभा रविवारी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पार पडली. यावेळी बोलताना ते असं म्हणाले आहेत. या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडली.
भाषणाची सुरुवात करताना राज ठाकरे म्हणाले की, “या व्यासपीठावर मी बाळासाहेब ठाकरे असताना अनेकदा आलो. शिवसेना पक्षाची स्थापनाच ही शिवतीर्थावर झाली. त्यावेळी माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे देखील उपस्थित होते. माझे वडील श्रीकांत ठाकरे देखील उपस्थित होते आणि आमची माँ (स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे) देखील उपस्थित होती. कारण आज या क्षणाला हे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आम्ही, आज माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, माझे वडील श्रीकांत ठाकरे आणि आमच्या माँ हजर असायला हव्या होत्या. हे सगळं चित्र पुन्हा एकदा मराठी बांधवांसाठी, मराठी माणसांसाठी, मुंबईसाठी आम्ही दोन भावानी उभारलेला लढा, इथे नसले तरी, वरून पाहत असतील.”
राज ठाकरे म्हणाले, “मी २० वर्षानंतर पहिल्यांदा युती करतोय. यातच युतीच्या या सगळ्या प्रोसेसमध्ये अनेक लोकांना तिकिटं दिली गेली. अनेक लोकांना तिकिटं नाही देता आली. अनेकजण नाराज झाले, काहींना वाटलं दुसऱ्या पक्षात जावं. अनेक गोष्टी झाल्या, काही गोष्टी आमच्याही हातात नसतात. पण त्यांना दुखावणं, हा आमचा हेतू नव्हता. मात्र तरीही जे दुःखी झाले असतील, नाराज झाले असतील, त्या सर्वांसाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. आपलेच आहेत, परत येतील. कारण जे आताच आहेत, ते कुठे जातील माहित नाही. त्यामुळे जे गेलेले आहेत, ते येतीलच परत. यामुळे या सगळ्या गोष्टी मी समजू शकतो.”
ते म्हणाले, “मी आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचं कारण म्हणजे मुंबईवर आलेलं संकट आहे. मी गेले अनेक वर्ष या सगळ्या विषयांवर बोलत आलोय, गेले अनेक वर्ष माझ्या भाषणात हे मुद्दे मांडत आलोय की, कशा प्रकारचा डाव रचला जातोय. मग मध्यंतरी या राज्य सरकारने हिंदी सक्तीचा विषय आणला. त्यावेळी मीही कडाडलो, उद्धव ठाकरे ही कडाडले. याआधी माझी एक मुलाखत झाली होती. त्यात मी सांगितलं होतं, कुठल्याही वादापेक्षा आणि कुठल्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. मग तिथून या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली. मात्र हिंदी सक्तीचा जो विषय होता, तो फक्त तुम्हाला चाचपडून बघण्याचा होता. तुम्ही जागे आहात का? मराठी माणूस महाराष्ट्र मुंबईमधला जिवंत आहे का? २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर या सरकारला काय फेफरं आलंय, जे मनाला वाटेल ते सुरू आहे. आली कुठून हिंमत? कोणाला विचारायचं नाही. जनता नावाची काही गोष्ट नाही. आम्हाला वाटलं म्हणून आम्ही केलं. कोण आहेत हे लोकं, कोण आहे महाराष्ट्रातील जनता? पैसे फेकले की, आम्ही विकत घेऊ. आला कुठून हा आत्मविश्वास. इतकी वर्ष मी राजकारण बघतोय. काँग्रेस आणि अनेक लोकं सत्तेत होते. मात्र ते जनतेला घाबरून असायचे. आता घराबणं वैगरे काहीच नाही. गृहीत धरून ठाकलं आहे, तुम्हाला. कुठून येतात मते यांच्याकडे, कशी येतात? काय येतात? याचा लढा बाकीच्या ठिकाणी सुरूच आहे. बोगस व्होटर ते ईव्हीएम मशीनपासून सगळ्या गोष्टी सुरू आहे.”
भाजपवर हल्लाबोल करत राज ठाकरे म्हणाले, “मात्र यात भाजपचा उद्दामपणा कुठवर गेला आहे बघा. अकोटमध्ये भाजपने एमआयएमशी युती केली. बदलापूरमध्ये भाजपने काँग्रेससोबत युती केली. ६६ जण बिनविरोध निवडून आले. म्हणजे तेथील मतदारांचा मतदानाचा अधिकारच काढून टाकला. ते मतदानच नाही करू शकत. आज ६६ आहेत, हे आकडे पुढे वाढत जाणार. त्यांना कळलं आहे की, कशा प्रकारे आपण लोकांना विकत घेऊ शकतो. वाईट या गोष्टीचं वाटतं, विकले जातात. तुळजापूरमध्ये विनोद गंगणे ड्रग्स रॅकेटमधील एक माणूस त्याला भाजपने तिकिटं दिलं. ड्रग्स विका, काही विका पुढच्या पिढ्या बरबाद करा. काही फरक पडत नाही. पण ड्रग्स रॅकेटमधील एक माणूस त्याला भाजपने तिकिटं दिलं, तुमच्या नाकावर टिचून. बदलापूरमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपी तुषार आपटे त्याला नगरसेवक केलं. लहान मुलीवर बलात्काराचा आरोप असलेला माणूस त्याला भारतीय जनता पक्षाने नगरसेवक केलं. आली कुठून हिंमत? वेड्यावाकड्या पद्धतीने निवडणूक जिकंण्याचं यंत्र-तंत्र हस्तगत होतं, त्यावेळी उद्दामपणा येतो. ही मस्ती हा माज हा त्यातून येतो. अख्खी मुंबई, महाराष्ट्र विकायला काढला.”
सभेदरम्यान राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ दाखवला. यामध्ये देशभरात आणि महाराष्ट्रात २०१४ नंतर म्हणजेच केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर उद्योगपती गौतम अदानी यांचा व्यवसाय आणि संपत्ती कशी वाढत गेली, हे दाखवलं आहे. २०१४ ते २०२५ पर्यंत गौतम अदानी यांना मोदी सरकारच्या कार्यकाळात देशातील अनेक राज्यांमध्ये उद्योगासाठी जमिनी देण्यात आल्या. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, जगात एकही माणूस नसेल जो दहा वर्षात इतका इतका श्रीमंत झाला. कुठल्या उदोगपतींनी उद्योग करू नये, इतक्या दळभद्री विचारांचा मी नाही. पण या देशात इतके उद्योगपती असताना एका माणसावर इतकी मेहरबानी होत आहे. जगातलं तर मी अजून दाखवलं नाही. सरकारने वीज, सिमेंट उद्योग त्यांना दिले. सिमेंट उद्योगात गौतम अदानी नव्हते. मात्र आज ते देशातील दोन नंबरचे सिमेंटचे व्यापारी आहेत. या माणसाने उद्या समजा वीज बंद केली, तर आम्ही अंधारात. सिमेंट महाग केलं तर, काही बोलू शकणार नाही. खालपासून वरपर्यंत सगळी पोर्ट्स अदानी यांना देण्यात आली. सगळी विमानतळं अदानी यांना देण्यात आली. महाराष्ट्रात २०१४ मध्ये अदानी यांचा एका ठिकाणी उद्योग होता. २०२५ पर्यंत जवळ जवळ सर्व महाराष्ट्रात उद्योग झाले. ही महाराष्ट्राची स्थिती आहे. एमएमआरमध्येही काय केलं ते पाहा.”
राज ठाकरे म्हणाले, “भाजपच्या डोक्यात सत्ता गेली आहे. भूगोल नीट समजून घ्या, वाढवण बंदरला लागून गुजरात आहे. पहिलीपासून यांच्या डोक्यात होतं की, मुंबई गुजरातला घेऊन जायची. मुंबई गुजरातला घेऊन जायची असेल तर, काय करावं लागेल तर, पालघर जिन्हा ताब्यात घ्यावा लागेल. ठाणे जिल्ह्याचा भाग ताब्यात घ्यावा लागेल. एमएमआर रिजनचा भाग ताब्यात घ्यावा लागेल, तर मुंबई ताब्यात घेता येईल. माणसे आधी तिथे बदाबदा टाका, त्यांचे मतदारसंघ फोडा, मराठा माणसांना फोडा. हे मतदारसंघ ताब्यात घ्या आणि त्याच्यानंतर सांगा, अरे खासदार तर आमचाच, आमदार आमचाच, नगरसेवकही आमचाच. महानगरपालिकाही आमच्याच हातात. हे सगळं करून मुंबई गुजरातला कशी जोडता येईल, यासाठी हे सगळे लॉन्ग टर्म प्लॅन सुरू आहे. एकदा मुंबई हातातून गेली की, हे महाराष्ट्र झारखंडापेक्षा वेगळा करणार नाही. मुंबई ही तुमची राजधानी आहे, मुंबई ही तुमची ताकद आहे. पण यांच्या अंगात मसतवालपणा शिरलेला आहे की, आम्ही काही करू, कुठूनही मते आणू. जे यांनी विधानसभा निवडणुकीत केलं, तेच हे आताही करण्याचा प्रयत्न करणार.”
ते म्हणाले, “मुंबई का पाहिजे हातात? आज केंद्रामध्ये यांची सत्ता, राज्यात यांची सत्ता, उद्या मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, एमएमआर रिजनमध्ये उद्या यांना काहीही करायचे असेल तर, महानगरपालिकेची परवानगी लागेल आणि महानगरपालिका आपल्या हातात असतील तर, हे जमिनी विकून देऊ शकत नाही. हे अदानी यांना जमीन देऊ शकत नाही.”



























































