पाणी गळती आणि चोरी रोखण्यासाठी पनवेल महापालिका अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मधुकर ठाकूर । उरण

पाण्याची गळती आणि चोरी रोखण्यासाठी महापालिका अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करणार असून ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि मुंबई महापालिकेच्या धर्तीवर परदेशातून मागविण्यात आलेली यंत्रणा लवकरच खरेदी केली जाईल. तसेच वेळ पडल्यास विहिरी, बोअरवेल्स आणि सर्व्हिस सेंटर ताब्यात घेऊन त्या पाण्याने पनवेलकरांची तहान भागविली जाईल, असे आश्‍वासन देताना येत्या आठवड्याभरात त्याची प्रचिती येईल, असे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांनी, शुक्रवारी (दि.27) महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन गंभीर बनलेल्या पाणी प्रश्‍नावर सविस्तर चर्चा केली. शिष्टमंडळात निवृत्त प्राचार्य बी. ए. पाटील, कांतीलाल कडू, निर्मला म्हात्रे, शशिकला सिंह, अँड. शितल कोळी-दिघे, सुधीर मोरे, आनंद भंडारी, सुधीर पवार, प्रतिभा सावंत, अस्लम कल्याणकर, पद्माकर चव्हाण, समिर खान, सुरज म्हात्रे आणि द्वारकानाथ भगत आदींचा समावेश होता.

पनवेलकरांसाठी ज्वलंत बनवलेल्या पाणी प्रश्‍नावर जनआंदोलन उभारण्यासाठी महापालिका क्षेत्रातील सामाजिक प्रमुख कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन महापालिका आयुक्तांना पाणी प्रश्‍न न सुटल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्याचसोबत पाच प्रमुख मागण्यांच्या आशयाचे पत्र दिले आहे. त्यावर आयुक्त देशमुख बोलत होते.

शासनाने दिलेल्या अधिकारांमुळे नैसर्गिक स्त्रोत असलेल्या खासगी विहिरी, बोअरवेल्स आणि सर्व्हिस सेंटर ताब्यात घेणे अगदी सोपं आहे. परंतु, अद्याप त्यासाठी थोडे दिवस थांबावे लागेल. पाणी समस्येने अगदीच उग्ररूप धारण केलेच, तर ते करावे लागेल. त्याची तयारी करून ठेवतो, असे देशमुख यांनी सांगितले.

टँकर दर नियंत्रणासाठी निविदा मागविली आहे. उद्या त्यावर निर्णय होईल. प्रत्येक टँकरवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात येईल. महापालिकेचा थेट अंकुश राहिल्याने पाणी चोरीला आळा बसेल. तसेच टँकर पाणी कुठून आणते, यावर देखरेख करण्यासाठी स्वतंत्ररित्या पथक नेमले जाईल, असेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

टँकर पूर्ण रिकामा करण्यासाठी उपाययोजना आखली जाईल. त्यामुळे टँकरमालकांनाही लगाम बसेल. लगेच जादूच्या काडीसारखे परिणाम जाणवणार नाहीत. एक मात्र, खरे की, यापुढे पाणी चोरी आणि त्यातून होणारी नागरिकांची फसवणूक टळली जाईल, असे ते म्हणाले.

नवीन बांधकामाला महापालिकेने पाणी पुरविणे थांबविले आहे. जोपर्यंत पाणी सुरळितपणे पुरविले जाईल, इतकी पाण्याच्या साठ्याची क्षमता निर्माण करण्याची तयारी पूर्ण होत नाही, तोपर्यंत कुठल्याही बांधकामाला महापालिका पाणी पुरविणार नाही, अशी ग्वाही त्यांनी शिष्टमंडळाला दिली.

धुळफेक करणारी फसवी पाणी योजना
पाणी प्रश्‍नावर 408 कोटीचा उतारा काढण्याचा ढोंगीपणा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी काढला आहे. त्याला महापालिकेची साथ मिळणे हा राजकीय जुमला असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी केली. मंत्रीमहोदय एकदा म्हणतात, राज्याच्या तिजोरीत ठणठणाट आहे, तर दुसरीकडे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून 408 कोटीची योजना आणल्याचे सांगून पनवेलकरांच्या डोळ्यात धुळफेक करीत आहेत. ही योजना तीन वर्षांनंतर पूर्ण होईल, तोपर्यंत पनवेलकरांचे पाण्यावाचून स्मशान पेटण्याची सरकारला प्रतीक्षा आहे का, असा प्रश्‍न त्यांनी देशमुख यांना केला.