‘महाराष्ट्र केसरी’च्या गदेचा फैसला आज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विठ्ठल देवकाते

 65व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचा थरार आता परमोच्च शिखरावर पोहोचलाय. कोण जिंकणार ‘महाराष्ट्र केसरी’ची मानाची चमचमती चांदीची गदा? याचा फैसला आज (दि. 14) रात्री होणार आहे. ‘महाराष्ट्र केसरी’ खुल्या गटाच्या माती विभागातून सिपंदर शेख व महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम लढत रंगेल. दुसरीकडे गादी विभागातून शिवराज राक्षे व हर्षवर्धन सदगीर हे अपेक्षेप्रमाणे अंतिम फेरीत भिडतील. यंदा सिपंदर शेख व शिवराज राक्षे हे ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे या स्पर्धेत नवा ‘महाराष्ट्र केसरी’ मिळणार की हर्षवर्धन दुसऱयांदा ही मानाची चांदीची गदा उंचावणार याकडे तमाम कुस्तीशौकिनांच्या नजरा असतील.

दोन ‘‘उपमहाराष्ट्र केसरी’ उपांत्यपूर्व फेरीतच गारद

माती विभागातून लातूरचा शैलेश शेळके व मुंबईचा विशाल बनकर हे माजी ‘उपमहाराष्ट्र केसरी’ मल्ल शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीतच गारद झाले. सोलापूरच्या बलदंड महेंद्र गायकवाडने शैलेश शेळकेवर 5-2 गुणांनी बाजी मारत आगेकूच केली. वासीमच्या सिपंदर शेखने मुंबईच्या विशाल बनकरला 10-0 अशा फरकाने लोळवीत आपली घोडदौड सुरूच ठेवली. याच विशालने गतवेळी साताऱयात झालेल्या स्पर्धेत सिपंदरचा विक्रमी गुणांच्या लढतीत पराभव करीत त्याचे ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचे स्वप्न भंगविले होते.