Tokyo Olympic बजरंगाची कमाल! कांस्यपदकावर मोहोर; हिंदुस्थानच्या झोळीत सहावे मेडल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा कुस्तीपटू बजरंगु पुनिया (Bajrang Punia) याने 65 किलो वजनी गटामध्ये कांस्यपदक जिंकले आहे. शनिवारी झालेल्या लढतीत बजरंगने कझाकीस्तानच्या दौलत नियाजबेकोव (Daulet Niyazbekov) याचा 8-0 असा दणदणीत पराभव करत कांस्यपदकावर विजयी मोहोर उमटवली. टोकियो ऑलिम्पिकमधील हिंदुस्थानचे कुस्तीतील हे दुसरे तर एकूण सहावे पदक आहे. 2012 ला झालेल्या लंडन ऑलिम्पिकनंतर पहिल्यांदाच हिंदुस्थानने कुस्तीत दोन पदके जिंकली आहेत.

पहिल्या मिनिटापासून बजरंगने कझाकीस्तानच्या कुस्तीपटूवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. पहिल्या 3 मिनिटानंतर बजरंगकडे 2-0 अशी आघाडी होती. मात्र बजरंगने मध्यांतरानंतर आपला आक्रमक खेळ दाखवला आणि 6 गुण मिळवले आणि आघाडी 8-0 अशी केली. शेवटच्या मिनिटापर्यंत ही आघाडी कमी करण्याचा प्रयत्न कझाकीस्तानच्या कुस्तीपटूने केला, मात्र यात तो अपयशी ठरला. बजरंगने दमदार बचाव करत सामना जिंकला.

सीमा बिस्लाकडून निराशा

हिंदुस्थानची महिला कुस्तीपटू सीमा बिस्ला हिने 50 किलो गटात सलामीच्याच लढतीत निराशा केली. तिला टय़ुनिशियाच्या सारा हमदी हिने 3-1 गुण फरकाने पराभूत केले. साराने पहिल्या पिरियडमध्ये एक, तर दुसऱ्या पिरियडमध्ये दोनदा एक-एक असे तीन गुण मिळवले. सीमाला पहिल्या तीन मिनिटांच्या फेरीत एकही गुण मिळवता आला नाही. दुसऱया पिरियडमध्ये एक गुण मिळवत तिने झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र सारापुढे तिचा निभाव लागला नाही.