तिरंदाजीच्या मिश्र गटात दीपिका-प्रवीण लढणार, पात्रता फेरीतील कामगिरीनंतर अतानू दासला वगळले

टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी तिरंदाजी या खेळात हिंदुस्थानची समीकरणे बदलताना दिसली. अतानू दासला शुक्रवारी झालेल्या पात्रता फेरीत चमक दाखवता आली नाही. त्यामुळे आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाकडून मिश्र गटात दीपिका कुमारी हिच्यासोबत अतानू दासऐवजी प्रवीण जाधवला संधी देण्यात आली. मिश्र गटातील लढती उद्या होणार आहेत. महाराष्ट्राच्या प्रवीण जाधव याने पात्रता फेरीत अतानू दास व तरुणदीप राय या हिंदुस्थानच्या दोन तिरंदाजांपेक्षा चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्याला बढती देण्यात आली.

सध्याच्या फॉर्ममुळे पार्टनर बदलला

दीपिका कुमारी व अतानू दास या जोडीने टोकियो ऑलिम्पिकआधी पॅरीस येथील वर्ल्ड कपमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिश्र गटात या दोघांचीच निवड करण्यात आली होती. पण शुक्रवारी झालेल्या पात्रता फेरीतील फॉर्म बघता दीपिका कुमारीसोबत अतानू दासऐवजी प्रवीण जाधवची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी वीरेंद्र सचदेवा यांच्याकडून या वेळी देण्यात आली. दरम्यान, मिश्र गटामध्ये हिंदुस्थानच्या जोडीला नववे स्थान देण्यात आले आहे.

पहिल्या फेरीत भुतानच्या खेळाडूला भिडणार

हिंदुस्थानची स्टार तिरंदाज दीपिका कुमारी हिने शुक्रवारी झालेल्या महिला गटाच्या वैयक्तिक प्रकारातील पात्रता फेरीत नववे स्थान मिळवले. यामुळे आता मुख्य फेरीतील पहिल्या टप्प्यात तिच्यासमोर तुलनेने सोपे आव्हान असणार आहे. दीपिका कुमारी-कर्मा यांच्यात पहिल्या फेरीची लढत होईल. भुतानची कर्मा ही खेळाडू जागतिक क्रमवारीत 193व्या स्थानावर असून टोकियो ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीत तिने 56वे स्थान मिळवले. दीपिका कुमारीने 663 गुणांसह नववे स्थान मिळवले. कोरियाच्या अॅन सॅन हिने 680 गुणांसह पहिल्या स्थानावर झेप घेतली.

मराठमोळ्या खेळाडूची चमक

ऑलिम्पिकमध्ये प्रथमच खेळत असलेल्या महाराष्ट्राच्या मराठमोळ्या प्रवीण जाधव याने पुरुषांच्या (वैयक्तिक) पात्रता फेरीत चमकदार कामगिरी केली. त्याने 656 गुणांची कमाई करीत 31वे स्थान पटकावले. त्याच्यापेक्षा जास्त अनुभव असलेल्या अतानू दासला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. त्याला प्रवीण जाधवपेक्षा तीन गुण कमी मिळाले. हिंदुस्थानचा तिसरा तिरंदाज तरुणदीप रायला 37व्या स्थानावर समाधान मानावे लागले.  पात्रता फेरीत 64 तिरंदाजांनी कौशल्य पणाला लावले.

आपली प्रतिक्रिया द्या