
फास्टटॅग लावलेल्या गाड्या टोलनाक्यावरुन बाहेर पडताना त्यातून आपोआप पैस कापले जातात. अशी फास्टॅगची यंत्रणा आहे. परंतु मध्यप्रदेशच्या नर्मदापुरमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीच्या फास्टॅगमधून 175 किमी लांब असलेल्या टोलनाक्यावरुन टोल कापला गेला. त्यामुळे गाडीच्या मालकाने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे.
नर्मदापुरममधील माखननगर रोडलगत राहणाऱ्या दयानंद पचौरी यांची गाडी त्यांच्या घराबाहेर उभी होती. 27 नोव्हेंबर रोजी त्यांच्या मोबाईलवर गाडीच्या फास्टटॅग मधून 40 रुपये टोल कापल्याचा मेसेज आला. हा टोल त्यांच्या घरापासून 175 किमी लांब असलेल्या टोलनाक्यावरुन कापण्यात आला होता. मेसेज पाहिल्यावर त्यांनी लगेचच नजीकच्या टोलनाक्याच्या टोल फ्री नंबरवर फोन करुन तक्रार नोंदवली. परंतु तक्रार केल्या नंतरही कोणतीच कारवाई झाली नाही.
टोलनाक्यावर केलेल्या तक्रारीवर कारवाई न झाल्यामुळे संतापलेल्या दयानंद यांनी सोशल मीडियाद्वारे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याशी संपर्क साधण्यासाठी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दयानंद यांनी नितिन गडकरी यांच्या कार्यालयाशी संपर्क केला. त्यावेळी कार्यालयातील लोकांनी त्यांना त्यांची तक्रार ई-मेलद्वारे पाठविण्यास सांगितली. दयानंद यांनी त्यानुसार तक्रारही केली आहे, मात्र त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.




























































