रत्नागिरी हापूसचा आज खवय्यांना बायबाय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
जे लोक लठ्ठपणामुळे त्रासले आहेत त्यांनीही आंब्याचे सेवन टाळावे, कारण त्यामध्ये खूप कॅलरीज असतात व त्यामुळे वजन वाढते.

 

सामना ऑनलाईन । नवीमुंबई 

आपल्या अवीट गोडीमुळे मुंबई, महाराष्ट्रासह देशविदेशात आकर्षणाचे विशेष केंद्र असलेला कोकणचा हापूस उद्या खवय्यांना अखेरचा बायबाय करणार आहे. देवगडपाठोपाठ रत्नागिरी हापूसचाही हंगाम आटोपला असून उद्या शेवटच्या 300 पेटय़ा एपीएमसीच्या फळमार्केटमध्ये येणार आहेत. त्यानंतर आंब्याचा बापूस म्हणून ओळखल्या जाणाऱया कोकणच्या हापूसची चव चाखण्यासाठी खवय्यांना वर्षभर वाट पाहावी लागणार आहे.

मे महिन्याच्या शेवटी देवगड हापूसचा हंगाम संपल्यानंतर बाजारामध्ये रत्नागिरी हापूसची विशेष चर्चा सुरू होती. मात्र उद्यापासून या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे. रत्नागिरी हापूसच्या शेवटच्या पेटय़ा उद्या मार्केटमध्ये येणार आहेत. देवगडनंतर रत्नागिरी हापूसचा हंगाम सुरू होतो. मात्र यंदा अवेळी पडलेल्या थंडीमुळे रत्नागिरी आणि देवगड हापूसचे मोठे नुकसान झाले.

थंडीमुळे झाडांची दोन-दोन वेळा फूट झाल्याने फळांचा आकार लहान राहिला आणि त्याचा परिणाम बाजारावर झाला. त्यामुळे यंदाचा हापूसचा हंगाम शेतकरी आणि व्यापारी यांच्यासाठी निराशाजनक राहिला. बाजारात असलेल्या आर्थिक मंदीचाही फटका यंदा हापूसला बसल्याने पेटीचे दर दोन हजारांच्या आतच राहिले.

कोकण हापूसचा हंगाम संपल्यानंतर आता जुन्नर आणि कर्नाटक हापूसचा हंगाम सुरू झाला आहे. येत्या 25 जूनपर्यंत हे दोन्ही हंगाम संपणार आहेत.कोकण हापूसबरोबरच सुरू झालेला कर्नाटक हापूसचा हंगाम अजून सुरूच आहे. येत्या आठवडय़ाभरात तोही आटोपणार आहे.

केशर, राजापुरी आणि पायरी या आंब्यांची आवकही आता मार्केटमध्ये वाढू लागली आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत निम्मे उत्पादन

वातावरणात झालेल्या बदलामुळे यंदा हापूसच्या मोहरावर त्याचा विपरीत परिणाम झाला. त्यामुळे कोकण हापूसचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत  यंदा निम्म्याने घटले. आवक कमी होऊनही दर न वाढल्यामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले, अशी प्रतिक्रिया एपीएमसीचे माजी संचालक संजय पानसरे यांनी व्यक्त केली.