आईल ऑफ व्हाईट

237

>> द्वारकानाथ संझगिरी

इंग्लिश चॅनलमधलं ‘आईल ऑफ व्हाईट’ खूप दिवस माझ्या बकेट लिस्टवर होतं. यावेळी विश्वचषकाच्या वेळी मी ती इच्छा पूर्ण केली.

फ्रेंच स्पेलिंग्ज आणि त्यांचे उच्चार हे गाढव आणि सुरेल ओरडणे इतके दूरचे आहेत. अर्थात इंग्लिश स्पेलिंग्ज आणि त्या शब्दांचे उच्चार हे कोकिळा आणि सुरेल आवाज इतकेही जवळचे नाहीत. त्यांना मध्येच सायलंट (मूक) शब्द टाकावेसे वाटतात. उदाहरणार्थ न्यूमोनियाच्या स्पेलिंगमध्ये ‘पी’ काय करतं ते मला कधीच कळलं नाही. या आईल (Isle) मध्ये ‘एस’चे काय काम? व्हाईटचं स्पेलिंग चक्क ‘Whight’ असं आहे. थोडक्यात ISLE of Wight असं इंग्लिशमध्ये लिहिलं जातं.

आयलंड म्हटलं की बंगले आले, रिसॉर्टस् आले. घराच्या गॅलरीत बसलं की समोरची निळाई डोळय़ाला सुख द्यावे असे समुद्राकडे तोंड करून बसलेले फ्लॅटस् आले. ज्याला ‘सुख’ असं आपण म्हणतो ते सर्व आहे. अगदी व्हिक्टोरियन काळापासून ब्रिटिश माणूस तिथे हॉलिडेसाठी जातो. इंग्लंडमध्ये वाळूचे किनारे खूप कमी आहेत. जिथे तिथे दगडगोटे असतात. त्यामुळे मऊ लुसलुशीत वाळू दिसली की गोरा माणूस तिथे धावतो. इथे या बेटावर दक्षिणेकडे शॅन्कलिन आणि व्हेन्टॉर हे सुंदर समुद्र किनारे आहेत. बरं हवामान ‘डिप्रेसिंग’ नाही. परमेश्वराने तिथे सूर्याची डय़ुटी लावलेली आहे. त्यामुळे हे बेट लोकप्रिय आहे. साऊथम्प्टनच्या बंदरापासून अर्ध्या-पाऊण तासात मोठय़ा बोटीने तिथे जाता येतं. तुमच्याकडे तुमची किंवा भाडय़ाची गाडी असेल तर उत्तम. बोटीतून घेऊन जाता येते. पोर्टसाऊथवरूनही तिथे जाता येते. आम्ही म्हणजे मी, विनायक दळवी, त्याची भाची अनुष्का आणि तिचा मित्र जेम्स असे साऊथम्प्टनहून गेलो. संपूर्ण बेटाभोवती फिरणारा एक रस्ता आहे. त्यावरून हुंदडलो.

ख्रिस्तपूर्व 95साली हे बेट ज्युलिअस सिझरने जिंकल्याचा दाखला आहे. त्याचं रोमन नाव व्हेक्टिस. रोमन्सनी या बेटावर शहर वसवलं नाही, पण यात रोमन व्हिला (बंगले) या बेटावर अजून पाहायला मिळतात. 1293 एडीपर्यंत ते चक्क नॉर्मन कुटुंबाचे होते. बेट विकत घेणं ही किती जुनी कल्पना आहे पहा. मग ते इंग्लंडच्या सिंहासनाचे झाले. 1860 साली फ्रेंचांनी या बेटावर हल्ला करू नये म्हणून बुरूज बांधण्यात आले. काम पक्कं होतं, म्हणून ते आज तसेच आहेत. व्हिक्टोरिया राणी तिथे लहानपणी सुट्टीसाठी यायची. तिथेच तिने ‘ऑसबोर्न हाऊस’ बांधलं. राणीचं हिवाळय़ातलं घर! हे घर नसतं, तो पॅलेस असतो. ते नुसतं बाहेरून पाहिल्यावर कळतं की त्याला पॅलेसऐवजी हाऊस म्हणणं म्हणजे शाहरूख खानच्या ‘हेरिटेज’ बंगल्याला ‘झोपडं’ म्हणण्यासारखं आहे. राणीने ते बेट हॉलिडेसाठी सुप्रसिद्ध केल्यावर तिथे कवी लॉर्ड टेनिसन, चार्ल्स डिकन्स (थोर कादंबरीकार) टेल ऑफ टू सिरीज किंवा डेव्हीड कॉपर फिल्ड लिहिणारा तिथे काही काळ राहिले. त्यांची तिथे घरं होती. डिकन्सने डेव्हिड कॉपर फिल्ड तिथे लिहिलं. ती जागा अशी आहे की, त्या निसर्गाच्या सान्निध्यात बसण्यावर वेगवेगळय़ा कल्पना स्फुरू शकतात. अर्थात सर्वोत्कृष्ट निर्मिती फक्त निसर्गरम्य ठिकाणीच झालीय असं नाही. ‘कमला’ हे महाकाव्य स्वा. सावरकरांना तुरुंगात स्फुरलं. टिळकांनी ‘गीतारहस्य’ मंडालेच्या तुरुंगात लिहिलं. पण तरीही निसर्ग आणि उत्तम निर्मिती याचा कुठेतरी संबंध असावा. म्हणूनच आचार्य अत्रे नाटकं किंवा पटकथा लिहिताना त्यांच्या खंडाळय़ाच्या बंगल्यावर जात. अर्थात मला तिथून परतल्यावर एखादं काव्य किंवा कादंबरी नाही सुचली. एका दिवसात काय सुचणार? त्यात माझी प्रतिभा सामान्य. हं, विश्वचषकाच्या ‘इंग्लिश ब्रेकफास्ट’ या माझ्या स्तंभातला एक चांगला लेख मात्र सुचला.

आयलंडमध्ये पाहायचं काय असं मला विचारलंत तर चटकन सुचणारं उत्तर आहे – अप्रतिम निसर्ग सौंदर्य, पडून राहावं असं वाटणारं समुद्राचं निळं पाणी, लोळावीशी वाटणारी वाळू. तिथल्या डोंगराने लाटेचे, वाऱयाचे प्रहार सहन करून घडवलेली शिल्पे आहेत. त्यात एक आपले डोळे तृप्त करते ते ‘निडल्स’, म्हणजे सुया. चक्क प्रचंड पांढरे खडू समुद्राच्या पाण्यात उभे आहेत असं वाटतं. पाण्याच्या वर ते तीस मीटर्स आहेत. त्याला जग निडल्स म्हणत असले तरी ते सुयासारखे नाहीत. कुऱहाडीच्या पात्यासारखे दिसतात. मग त्याला निडल्स का म्हणतात? तर त्याचं उत्तर असं आहे की, चॉय जो समुद्रातून डॉल्फिनसारखा वर आलेला सुळका होता तो सुईसारखा होता. तो 1764 साली एका वादळात कोसळला. त्याला ‘निडल’ म्हणत. ते नाव चिकटलं ते चिकटलं. ते इंग्लंड आहे. तिथे नावाच्या पाटय़ा राज्यकर्त्यांच्या मर्जीप्रमाणे बदलत नाहीत. त्यांना इतिहास जपणं आवडतं. त्याच्याजवळच्या भागाला ‘ऍलम बे’ म्हणतात. निसर्गाच्या ज्या स्वतःच्या विविध लीला सुरू असतात. उदा. वादळ, भूकंप वगैरे. त्यातून असं काहीतरी अद्भुत उभं राहतं आणि जी ब्रिटिशांसारखी हुशार मंडळी असतात ते त्याचं सुंदर मार्केटिंग करतात. नैसर्गिक शिल्पांचं आकर्षण असणारी माझ्यासारखी माणसं तिथे जातात. आपल्या देशाचा समुद्र किनारा केवढा मोठा आहे. त्यानेही वादळ, लाटा, भूकंप झेलले आहेत. तिथेही विविध शिल्पे तयार झाली आहेत, पण ती जगासमोर आलेली नाहीत. कारण जगासमोर आणण्यासाठी लागणारा उत्साह आपल्या ‘निर्णय घेणाऱया’ मंडळीत नाही. असो. किती दुःख उगळायचे! तर त्या ‘ऍलम बे’ला एक जी जेट्टी (बोटीचा धक्का) आहे तिथून बोटीने या निडल्सच्या जवळ जाता येते. डोंगरावरून तिथे जायला एक छोटीशी केबल कार आहे, खरं तर चेअरकारच ती! आम्ही तिथे गेलो तेव्हा पिसाट वारा म्हणजे काय याची मला जाणीव झाली. तो फक्त टोपी, स्कार्फ, कोट वगैरे उडवत नव्हता. तो माणसालाच उडवत होता. असा वारा मी आयुष्यात त्या आधी एकदा, दक्षिण आफ्रिकेत टेबल लॅण्डवर अनुभवलाय. न उडण्यासाठी मला कसून प्रयत्न करावे लागत होते. त्यामुळे ती चेअर कार, ती बोट वगैरे सर्व बंद होतं. डोंगरावरूनही ते खडू मस्त दिसत होते. कारण त्यावर सूर्यप्रकाश पडला होता. पण त्या ‘खडूंचा’ फोटो काढता आला नाही. कारण कठडय़ाला धरलेला हात सोडून नुसतं उभं राहणंच कठीण होतं. हा अनुभवच वेगळा होता.

तिथून आम्ही ‘ऍलपेकॅस’ फार्मला गेलो. ‘ऍलपेकॅस’ हे अंगावर भरपूर लोकरीसारखे केस असलेले प्राणी. ते साधारण समुद्रसपाटीपासून अकरा हजार फुटांवर सापडतात. विशेषतः दक्षिण अमेरिकेत. तिथून आणून त्यांना या बेटावर त्यांचे प्रजोत्पादन केलंय. त्यांचे जे केस म्हणा, लोकर म्हणा असतात त्यातून ब्लँकेटस्, हॅटस्, स्वेटर्स, मोजे, ग्लोव्हज् तयार करतात. आपल्या बकऱया, कोंबडय़ा, कुत्रे वगैरे उंच, धष्टपुष्ट आणि लोकरीने भरलेले केले की कसे दिसतील तसे ते दिसतात. त्यांच्याबरोबर दोन तास वगैरे ट्रिप असते. म्हणजे त्यांच्याबरोबर फोटो काढायचे, त्यांना गवत द्यायचं वगैरे. गोरे काय काय कल्पना लढवतात पैसे कमवायला!

असो, साऊथम्प्टनला गेलात तर मारा एक चक्कर आईल ऑफ व्हाईटला.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या