
कर्जत तालुक्यातील नेरळजवळील पेब किल्ला (विकटगड) येथे ट्रेकिंगसाठी आलेल्या एका पर्यटकाच्या पायावर दगड कोसळल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र नेरळ पोलिसांच्या तत्परतेने आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पर्यटकाची सुखरूप सुटका करण्यात आली.
ठाणे येथील सातजणांचा ट्रेकिंग ग्रुप रविवारी सकाळी पेब किल्ल्यावर फिरण्यासाठी आला होता. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ट्रेकिंग करत असताना रोहन कदम (२५) याच्या पायावर अचानक मोठा दगड कोसळला.
दगडाचे वजन अधिक असल्याने त्याचा पाय त्याखाली अडकून पडल्यामुळे त्याला हालचाल करता येत नव्हती. त्यामुळे त्याच्या सहकाऱ्यांनी तातडीने नेरळ पोलिसांकडे मदतीची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी राहुल वरोटे यांनी तत्काळ बचाव पथक घटनास्थळी रवाना केले. पोलीस शिपाई कनके व महाकाल यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दुर्गम ठिकाणी पोहोचून पायावर पडलेला महाकाय दगड बाजूला करत रोहन कदम यांची सुटका केली.




























































