
एल्फिन्स्टन पूल तोडल्यामुळे दादरमधील वाहतूक व्यवस्थेवर आधीच ताण पडलेला आहे. त्यातच दादर (पश्चिम) वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. दादर स्टेशन परिसर, भवानी शंकर मार्ग, कबुतरखाना, पोर्तुगीज चर्चसारख्या सतत गजबजलेल्या मार्गांवर सर्वत्र ‘नो एन्ट्री’चे बोर्ड लावून वाहतूक बंद करून टाकली आहे. ‘बॅरिकेड्स’ टाकून या मार्गावर मोटारी आणि टॅक्सींना प्रवेश बंद केल्यामुळे नागरिकांना रणरणत्या उन्हात पायपीट करावी लागत आहे. बदललेल्या वाहतूक व्यवस्थेमुळे दादरमधील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
दादर पश्चिमेकडील सर्वाधिक वर्दळ असलेल्या गोल मारुती मंदिराच्या बाहेरील एक रस्ताही वाहतुकीसाठी बंद केला आहे. कबुतरखान्याकडून बोले मार्गाकडे जाणाऱ्या मार्गावरही बॅरिकेड्स लावले आहेत. कबुतरखान्यासमोरील जैन मंदिरासमोरही बॅरिकेड्स लावले आहेत. त्यामुळे कबुतरखाना-मारुती मंदिराकडून पोर्तुगीज चर्चकडे जाणारा मार्गही बंद झाला आहे. भवानी शंकर मार्गावरील गजानन महाराज चौकातही बॅरिकेड्स लावले आहेत. या बदललेल्या वाहतूक व्यवस्थेचा दादरकरांना प्रचंड त्रास होत आहे. त्यातून स्थानिक नागरिक आणि पोलिसांमध्ये सध्या वाद होत आहेत.
पादचाऱ्यांच्या जिवाला धोका
रानडे रोडकडून दादर (प) स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर बाबाराव सावरकर चौकासमोर वाहतूक पोलिसांनी प्लास्टिकचे बॅरिकेड्स लावले आहेत. मोटरसायकल आणि मोटारी स्टेशनकडे जाऊ नयेत म्हणून रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. रानडे रोडवर लावलेल्या बॅरिकेड्समध्ये थोडी मोकळी जागा ठेवली आहे. त्यातून पादचाऱ्यांना रस्ता पार करावा लागतो. वयोवृद्ध नागरिकांना तर रस्ता क्रॉस करता येत नाही. चिंचोळ्या जागेतून रस्ता पार करताना दोन-तीन जणांचे अपघात झाले आहेत, असे वाहतूक पोलिसांनीच सांगितले.
बेस्ट-टॅक्सी प्रवाशांचे अतोनात हाल
दादर स्टेशन, पोर्तुगीज चर्च, भवानी शंकर मार्ग, कबुतरखाना अशा सदैव वर्दळीच्या मार्गावरील महत्त्वाच्या रस्त्यांवर नो एन्ट्री केल्यामुळे बेस्टच्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. टॅक्सीतून घरी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना इमारती आणि घराजवळ टॅक्सीने पोहोचता येत नाही. त्यामुळे उन्हात चालत जाण्याशिवाय पर्याय नाही. बदलेली वाहतूक व्यवस्था दादरकरांच्या जिवावर उठल्याची भावना या भागातील ज्येष्ठ नागरिक साबाजी सावंत यांनी व्यक्त केली. पोर्तुगीज चर्चसमोरच बॅरिकेड्स टाकून रस्ता बंद करून टाकला आहे. त्यामुळे पोर्तुगीज चर्चकडून सिद्धिविनायक मंदिराकडे जाण्याचा आणि सयानी रोडचा मार्गच बंद झाला आहे.
24 ऑगस्टपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल
वाहतूक पोलिसांनी 26 मे ते 24 ऑगस्टपर्यंत दादरमधील वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत. त्याची पोस्टर्स सर्वत्र लावलेली आहेत, पण त्यामागील कारण वाहतूक विभागाने स्पष्ट केलेले नाही. या बदललेल्या वाहतूक व्यवस्थेच्या संदर्भात वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त दीपाली घाटे यांच्याशी मोबाईलवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
























































