आधी नवा उड्डाण पूल बांधणार, मगच जुन्या पुलावर हातोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील रेल्वे मार्गावरील धोकादायक ठरविलेल्या तब्बल दहा उड्डाण पुलांचे काम लवकरच सुरू होणार आहे. या पुलांचे ड्रोन सर्वेक्षण, जिओलॉजिकल सर्वे आणि डिझाईन हे सर्व काही तयार झाले असून पावसाळय़ाच्या आधी पायलिंगचे काम सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी 10 पैकी साधारण सहा पुलांना न तोडता त्या जागी नवे पूल आधी बांधले जाणार आहेत. त्यानंतरच जुन्या पुलांना पाडण्याबाबत विचार करण्यात येणार असल्याने मुंबईतील संभाव्य वाहतूककोंडी टळणार आहे.

रेल्वे ट्रॅकवरील उड्डाण पुलांच्या बांधणीवरून नेहमीच पालिका आणि रेल्वेमध्ये होणारे ‘सीमावाद’ टाळण्यासाठी 2017 मध्ये महाराष्ट्र रेल इफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमआरआयडीसी) लिमिटेडची स्थापना करण्यात आली. राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाच्या 50ः50 टक्के सहभागातून रेल्वेच्या पायाभूत सुविधांची उभारणी केली जाणार आहे. या संस्थेला बाजारातून, वित्तीय संस्थांकडून कर्ज उचलण्याचेही अधिकार देण्यात आल्याने आता रेल्वे मार्ग टाकण्यासारखे मोठय़ा प्रकल्पांची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

10 उड्डाण पुलांची बांधणी

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील 10 उड्डाण पुलांची बांधणी केली जाणार आहे. सर्वात आधी भायखळा येथील ओलीवेंट ब्रिजचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यानंतर अनुक्रमे महालक्ष्मी, आर्थर ब्रिज, घाटकोपर, लोअर परळ, बेलासिस, गार्डन ब्रिज, टिळक ब्रिज, रे रोड, करी रोड आदी उड्डाण पुलांची बांधणी केली जाणार आहे. तसेच माटुंगा लेबर कॅम्प येथे सबवेदेखील बांधण्याची योजना असल्याचे एमआरआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांनी सांगितले.

650 दिवसांत बांधकाम पूर्ण

नवा पूल झाल्यावर त्याच्या खाली जुन्या पुलाला पाडण्याऐवजी त्याच्यावर पादचाऱयांना जाण्याचा मार्ग तसेच बगिचा तयार करण्याची योजना असल्याची योजना असल्याचे राजेश कुमार जयस्वाल यांनी सांगितले. पालिकेकडून जमीन अधिग्रहण, वाहिन्यांना हटविणे आणि निधी उपलब्ध करणे ही कामे झाल्यानंतर 650 दिवसांत हे पूल बांधून पूर्ण केले जाणार आहेत. पूल वेळेत पूर्ण झाल्यास 2 टक्के बोनस वाटला जाणार आहे. तसेच उशीर केल्यास 9 ते 11 टक्के दंड केला जाणार आहे.

राज्यभरात 69 पूल बांधणार

रेल्वेची फाटके बंद करून तेथे एमआयआरडीसीमार्फत 69 उड्डाण पूल बांधण्यात येणार आहेत. अंधेरीच्या गोखले पुलाची पादचारी मार्गिका कोसळल्यानंतर सर्व रेल्वे पुलांचे सेफ्टी ऑडिट करण्यात आले होते. त्यात लोअर परळ येथील पूल आयआयटी तंत्रज्ञांनी धोकादायक ठरविल्यानंतर तो पाडण्यात आला. त्यावेळी हद्दीचा वाद निर्माण झाला होता. आता या पुलाचा रेल्वेच्या हद्दीतील भाग पश्चिम रेल्वे बांधणार आहे. तर शहराच्या हद्दीतील भाग पालिका बांधणार आहे.

उड्डाण पुलांची नावे

  • भायखळा
    भायखळा-सँडहर्स्ट रोड
  • ओलीवेंट
    भायखळा-सँडहर्स्ट रोड
  • महालक्ष्मी
    महालक्ष्मी स्थानक
  • आर्थर रोड
    चिंचपोकळी स्थानक
  • घाटकोपर घाटकोपर स्थानक
  • बेलासिस मुंबई सेंट्रल
  • गार्डन (एस ब्रिज)
    भायखळा स्थानक
  • टिळक ब्रिज दादर स्थानक
  • रे रोड रे रोड स्थानक
  • करी रोड करी रोड स्थानक

डबलडेकर तसेच केबल स्टेएड ब्रिज

हे ब्रिटिश काळातील पूल शंभर वर्षे जुने आहेत. त्यांना उभारताना शहरात कमी जागा उपलब्ध असल्याने नवे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. या पुलांना बांधताना कमी पिलर लागावेत यासाठी बहुतेक ब्रिज केबल स्टेएड आधारित तंत्रज्ञानाआधारेच उभारले जातील. शिवाय जुन्या पुलावर त्याच जागी काही मीटर उंचीवर नवा डबल डेकर पूल बांधण्याची चाचपणी सुरू आहे. असे बांधकाम केल्याने जुना पूल आधीच तोडून वाहतूक बंद करण्याची गरज राहणार नाही.