भुईबावडा घाटात दरड कोसळली, खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत

भुईबावडा घाटात सोमवारी सकाळी मोठी दरड कोसळल्याने खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. दरडीमध्ये मोठे दगड आणि मातीचा ढिगारा असल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. दुपारी उशिरापर्यंत दरड हटविण्याचे काम सुरू होते.

घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही करत दरड हटवण्यासाठी जेसीबी घटनास्थळी दाखल केला आहे. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील दगड आणि माती बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दरड हटवण्याचे काम पूर्ण झाल्यावर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल. तोपर्यंत प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.