कळव्याच्या तिसऱ्या खाडीपुलावर गेट सेट गो, ट्रॅफिक कोंडीचा हेडॅक संपणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाहनांच्या लांबच लांब रांगांमुळे तासन् तास कोंडीत लटकणाऱ्या ठाणे-कळवावासीयांसाठी खूशखबर आहे. लवकरच कळव्याच्या तिसऱ्या खाडीपुलावरून प्रवास सुसाट होणार आहे. येत्या डिसेंबरमध्ये या तिसऱ्या नव्या खाडी पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली होणार आहे. त्यामुळे ठाण्याच्या जेल तलावापासून साकेत ते थेट विटाव्याच्या सबवेपर्यंत उड्डाणपुलाच्या कामामुळे होणाऱ्या ट्रॅफिककोंडीचा हेडॅक संपणार आहे. विशेष म्हणजे, साकेत ते कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयापर्यंतच्या मार्गिकेचे कामही सध्या वेगाने सुरू असून ही मार्गिकाही लवकरच चालू होणार आहे. त्यामुळे ठाणे-कळवावासीयांनो, आता गेट…सेट…गो.

ब्रिटिशकालीन कळवा खाडीवरील पुलाने ठाणे आणि कळवामधील अंतर कमी झाले. त्यातच या पुलाचे आयुर्मान संपल्याने त्यावरून वाहनांच्या वाहतुकीला रेड सिग्नल लागला. याचदरम्यान 1995 साली ठाणे महापालिकेने त्या पुलाच्या शेजारी दुसरा पूल उभा केला, मात्र दिवसेंदिवस वाढत्या वाहनांच्या संख्येने या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊ लागली. त्यामुळे आणखी एका पुलाची गरज लक्षात घेऊन तिसऱ्या पुलाच्या उभारणीस 2014 साली सुरुवात झाली. या पुलाचे काम तीन वर्षांत होणे अपेक्षित होते, मात्र या पुलाचा काही भाग हा सीआरझेडमध्ये येत असल्याने मंजुरीस विलंब झाला होता. त्यामुळे या विभागाकडून परवानगी मिळण्यास विलंब झाला. त्यानंतर आलेल्या कोरोनामुळे पुन्हा पुलाचे काम रखडले.

पोलीस आयुक्तालयाकडून कळवा रुग्णालयापर्यंत सुसाट
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयासमोरील मार्गिकेवरून या वर्षअखेर वाहने धावणार आहेत. कळवा नाका, मध्यवर्ती कारागृह ते कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयापर्यंत ही मार्गिका जाणार असल्याने वाहनांची कळवा नाक्यावरील कोंडी फुटणार आहे, तर साकेत ते कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयापर्यंतच्या मार्गिकेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. ते कामही लवकरात लवकर पूर्ण होईल, असे पालिकेचे नगर अभियंता अर्जुन अहिरे यांनी सांगितले.

एक हजार मेट्रिक टनाचे बास्केट हॅण्डल
कळवा खाडीवरून जाणाऱ्या या पुलाच्या गर्डरचे अर्थात बास्केट हॅण्डलचे वजन तब्बल एक हजार मेट्रिक टन असून पुलाच्या फॅब्रिकेशनचे काम दमण येथील मे. पी. एस. एल. कंपनी करत असून सुप्रिम जे. कुमार कंपनी पुलाचे बांधकाम करत आहे तसेच तज्ज्ञ सल्लागार म्हणून मे स्तूप कन्सलटंट प्रा. लि. काम पाहात आहे.