
मुंबई व आसपासच्या शहरात शस्त्रांत्राचा सप्लाय करणारा एक तरुण ट्रॉम्बे पोलिसांच्या हाती लागला आहे. तसेच त्याने ज्या व्यक्तीला एक पिस्तूल विकले होते त्यालाही पोलिसांनी अटक करून तब्बल आठ पिस्तुले व 15 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
एक तरुण मोठय़ा प्रमाणात पिस्तुले व जिवंत काडतुसे घेऊन मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरात येणार असल्याची खबर ट्रॉम्बे पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक शरद नाणेकर, विजयसिंह देशमुख, अजय गोल्हार व पथकांनी आवश्यक माहिती मिळवून महाराष्ट्र नगर परिसरात सापळा रचून चेतन माळी (26) याच्यावर झडप घातली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ चार पिस्तुले व आठ जिवंत काडतुसे सापडली. चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आणखी तीन त्याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण पोलिसांनी केले असता त्याचे बोरीवली येथे राहणाऱया सिनू पडिगेला (48) याच्यासोबत शस्त्रांबाबत संभाषण झाल्याचे समोर आले. मग पोलिसांनी बोरिवली गाठून सिनूला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ एक पिस्तूल मिळाले.
सिनूला भावाच्या हत्येचा घ्यायचा होता बदला
बोरीवली येथे राहणारा सिनू हा मूळचा हैदराबादचा आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्या भावाची हत्या झाली होती. त्यामुळे तो रोष त्याच्या डोक्यात होता. म्हणून त्याने भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी चेतनकडून एक पिस्तूल घेतले होते. योग्य संधी साधून भावाच्या मारेकऱयाला ठोकायचे असा त्याचा कट होता, पण त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला पकडले. दरम्यान, चेतन हा गेल्या वर्षभरापासून मुंबई व आसपासच्या शहरांमध्ये शस्त्रांचा पुरवठा करीत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. तो कोणाकडून शस्त्र घेतो आणि कोणाला विकतो तसेच सिनू त्याच्या संपर्कात कसा आला याचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.





























































