
सामना प्रतिनिधी । मुंबई
मोबाईल स्टेटस म्हणून आयफोन वापरणाऱया अॅपलप्रेमींनो, सावधान! लवकरच तुमचा आयफोन हिंदुस्थानी नेटवर्कवर काम करायचे बंद करणार आहे. फेक कॉल्स आणि स्पॅम मॅसेज रोखण्यासाठी ट्रायने आयफोनकरिता डीएनडी म्हणजेच डू नॉट डिस्टर्ब हे ऑप्लिकेशन तयार केले असून अॅपल आपल्या ग्राहकांना हे ऑप्लिकेशन पुरविण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे ट्रायने हिंदुस्थानातील वोडाफोन, एअरटेलसारख्या कंपन्यांना नोटीस धाडून अॅपलचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याचा इशारा दिला आहे. रजिस्ट्रेशन रद्द झाल्यास आयफोनद्वारे होणारा संवाद थांबणार आहे.
ट्रायने अॅपलकरिता डू नॉट डिस्टर्ब या ऑप्लिकेशनचे अद्ययावत वर्जन डीएनडी २.० तयार केले आहे, परंतु ऍपलच्या ऍप स्टोअरमध्ये युजर्ससाठी अद्यापही हे ऑप्लिकेशन उपलब्ध नाही. याउलट अॅण्ड्रॉईड प्लेस्टोअरवर हे ऑप्लिकेशन ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले असून अनेक युजर्सनी ते डाऊनलोडही केले आहे.
माहिती लिक होण्याची शक्यता
डीएनडी अॅप युजर्सकडून कॉल तसेच मेसेज रेकॉर्ड करण्याची परवानगी मागतो त्यामुळे युजर्सची माहिती लिक होण्याची शक्यता असल्याने अॅपलस्टोअरमध्ये हे ऑप्लिकेशन देण्यात आलेले नाही. तसेच ट्रायच्या अॅपऐवजी ऍपल डीएनडीच्या धर्तीवर स्वतःचे ऑप्लिकेशन तयार करणार आहे असे अॅपलचे म्हणणे आहे.



























































