सचिन पिळगावकर यांच्या ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित

245

सामना ऑनलाईन । मुंबई

एखाद्या व्यक्तीवर आपण मनापासून आणि अगदी वेड्यासारखं प्रेम करतो तेव्हा त्याला हिंदीत आशिकी असे म्हणतात. आशिकी करताना मैत्री, प्रेम, रोमान्स, एक्सप्रेशन्स, भावना, कन्फ्युजन या गोष्टी प्रत्येक जण अनुभवतात. प्रेमाची नवीन डेफिनेशन देणारी कथा घेऊन सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ हा मराठी सिनेमा दाखल होणार आहे.

गुलशन कुमार प्रस्तुत ‘अशी ही आशिकी’ सिनेमाची निर्मिती टी-सिरीजचे भूषण कुमार आणि क्रिशन कुमार यांनी केली आहे. तसेच मुव्हिंग पिक्चर्स आणि सुश्रिया चित्र यांनी देखील या सिनेमाची निर्मिती केली असून वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे ही या सिनेमाचे निर्माते आहेत. पूर्वी प्रेम व्यक्त करण्यासाठी फूल आणि प्रेमाचे दोन शब्द पुरेसे होते. पण आताची पिढी ही एक पाऊल पुढे असल्यामुळे आता कनफेशनचं कनफ्युझन आणि इमोशनचं कमोशन झालंय. प्रेम जरी गुंतागुंतीचं बनलं असलं तरी स्वयम आणि अमरजाची आशिकी ही जरा वेगळीच आहे, याचा अंदाज प्रेक्षकांना ‘अशी ही आशिकी’च्या टीझरमधून आला होता.

आता प्रेक्षकांना या सिनेमाच्या कथेची आणखी एक झलक दाखवण्यासाठी ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ सारख्या रोमँटिक दिवशी ‘अशी ही आशिकी’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे या नवीन जोडीची रोमँटिक कथा, कथेचा एकंदरीत अंदाज, सुनिल बर्वे, निर्मिती सावंत, मित्रांच्या भूमिकेत असलेले करण भानुशाली, स्नेहल बोरकर, स्वामिनी वाडकर आणि सिद्धेश नागवेकर या कलाकारांची एक झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. ‘तेरी मेरी मेरी तेरी आशिकी’ म्हणत प्रत्येकाला ‘अशी ही आशिकी’ करायला भाग पाडण्यासाठी हा सिनेमा 1 मार्च 2019 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या