शेकडो सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

15

सामना प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्यांना अखेर आज मुहूर्त मिळाला. गृह खात्याने 101 सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या केल्या.

राज्यातील अनेक सहाय्यक पोलीस आयुक्त बदलीच्या प्रतीक्षेत होते, पण मे महिना गेला तरी बदल्यांचा ठावठिकाणा नव्हता. अखेर बरेच दिवस लांबलेल्या बदल्या आज गृह खात्याने केल्या. त्यात नागरी हक्क संरक्षण विभागाचे श्रीपाद काळे यांची दहशतवादविरोधी पथकात, मसुबचे सुनील घोसाळकर यांची ठाणे शहर तर मुंबई वाहतूक शाखेचे विनायक वस्त यांची नवी मुंबई येथे बदली झाली आहे.

दरम्यान, बदल्या झाल्या, आता वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्तपदी बढती कधी मिळणार याच्या सर्वजण प्रतीक्षेत आहेत. वरिष्ठ निरीक्षकांना एसीपीपदी बढती मिळाल्यास त्यांच्या रिक्त जागी पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ निरीक्षकपदी बढती मिळेल. तसेच अनेक पोलीस ठाण्यांत पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या जागा रिक्त असून त्यादेखील भरल्या जातील. पण त्यासाठी आणखी किती दिवस लागणार असा सवाल अधिकाऱयांसमोर उभा ठाकला आहे.

अडीच वर्षे झाली तरी बढती नाही
शेकडो उपनिरीक्षकांना गेल्या अडीच वर्षांपासून बढती देण्यात आलेली नाही. त्या उपनिरीक्षकांचे काही बॅचमेट अडीच वर्षांपूर्वी सहाय्यक निरीक्षक झाले पण उर्वरित उपनिरीक्षकांना अजूनही बढतीच्या प्रतीक्षेत दिवस काढावे लागत आहेत. गृहखाते आमची कधी दखल घेणार असा सवाल ते अधिकारी करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या