
सामना प्रतिनिधी। नवी मुंबई
ट्रान्सहार्बरने शनिवारी चाकरमान्यांचा विकेंड लोच्या केला. ऑफिस गाठण्याच्या ऐन गर्दीच्या वेळेतच तुर्भे-सानपाडा दरम्यान ओव्हरहेड वायर तुटून लोकलसेवा तीन तास ठप्प झाली. त्यामुळे ट्रान्सहार्बर मार्गावरील खोळंब्यामुळे प्रवाशांचा अक्षरशः घामटा निघाला. सर्व दहा रेल्वे स्थानकांवरील फलाटांवर तुडुंब गर्दी झाल्याने वृद्ध, मुले व महिला प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
शुक्रवारी गुड फ्रायडेला मध्य रेल्वेने रविवारचे वेळापत्रक चालवून प्रवाशांना ‘धक्का’ दिल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी ट्रान्सहार्बरने मनस्ताप दिला. सकाळी 7.30 च्या सुमारास सानपाडा रेल्वे स्टेशनलगतच्या 30/12 किलोमीटर खांबालगत असलेली ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे ठाणे-वाशी मार्गावरील लोकलसेवा पूर्णपणे ठप्प झाली. याचा फटका जुईनगर, नेरूळ मार्गावरील रेल्वे प्रवाशांनाही बसला. रेल्वेच्या तांत्रिक दुरुस्ती पथकाला अथक प्रयत्नानंतर ही ओव्हरहेड दुरुस्ती करण्यास दहा वाजता यश आले. त्यानंतर जवळपास एक तासांनंतर ही लोकलसेवा सुरळीत झाली.






























































