
पारदर्शक त्वचेचा दुर्मीळ ऑक्टोपस प्रशांत महासागरात सापडला आहे. या ऑक्टोपसच्या शरीरातून आरपार बघता येते. अगदी त्याच्या शरीरातील अवयव आणि पचन संस्थाही दिसते. संशोधकही अशा अनोख्या ऑक्टोपसविषयी ऐकून हैराण झाले आहेत.
संशोधकांना प्रशांत महासागरात फिनिक्स बेटांजकळील खोल पाण्यात संशोधन सुरू असताना हा दुर्मीळ ऑक्टोपस आढळला. या प्रजातीचे नाव विट्रेलेडोनेला रिचार्डी असे आहे. 1918 साली पहिल्यांदा या पारदर्शक ऑक्टोपसबद्दल माहिती मिळाली होती. याला ग्लास ऑक्टोपस असेही काही जण म्हणतात. महासागरात एकदम खोलवर हा ऑक्टोपस पोहतो. त्यामुळे त्याला कॅमेऱयात टिपणे कठीण असते. त्याची लांबी 11 सेंटीमीटर असते. त्याच्या पूर्ण शरीराची लांबी 45 सेंटीमीटर इतकी मोठी होऊ शकते. त्याचे डोळे आयताकृती असतात.


























































