
सामना प्रतिनिधी, कराड
कराड येथे नव्याने बांधण्यात आलेल्या एसटी स्टँडमध्ये चालक-वाहकांसाठी अद्ययावत वातानुकूलित खोली तयार करण्यात आली आहे. राज्यातील हा पहिलाचा उपक्रम ठरला आहे. आता राज्यातील प्रत्येक एसटी स्टँडमध्ये चालक-वाहकांसाठी सर्व सुविधायुक्त गेस्टरूम निर्माण केली जाणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे.
एसटीमध्ये वडील चालक असल्याने एसटीचे आपणही काहीतरी देण लागतो या उद्दात हेतूने कराडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे आणि त्यांचे बंधू डॉ. बजरंग शिंदे यांनी त्यांचे वडिल बाळकृष्ण शिंदे यांच्या स्मरणार्थ स्वखर्चातून एसटीचे चालक-वाहक यांना राहण्यासाठी सुसज्ज असे 29 बेड, वातानुकुलीत रुम, आंघोळीच्या गरम पाण्यासाठी सोलरची सोय केली आहे. चालक-वाहकांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चातून सोय केलेला राज्यातील हा पहिलाचा उपक्रम ठरला आहे.
कराडचे उपप्रादेशिक अधिकारी अजित शिंदे आणि डॉ. बजरंग शिंदे यांनी चालक-वाहकांसाठी केलेल्या उपक्रमाची दखल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतली असून ज्यात 98 नवीन बसस्थानकाचे काम सुरू आहे. या ठिकाणी चालक-वाहकांसाठी सुविधा उपलब्ध करीत असल्याची माहिती दिवाकर रावते यांनी दिली आहे. त्याचबरोबर कराड येथे एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या सुविधेबद्दल समाधान व्यक्त करुन हा उपक्रम राज्यातील सर्व बसस्थानकात राबवण्याची घोषणा मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे.
सर्वसामान्यांच्या प्रवासासाठीचे वाहन म्हणून एसटीकडे पाहिले जाते. ग्रामीण भागातील वाडी-वस्तीसह मोठ्या शहरामध्ये एसटीचे जाळे पसरले आहे. त्यासाठी एसटीचे चालक-वाहक रात्रंदिवस कार्यरत असतात. अनेकदा लांबून प्रवास करून आल्यावर चालकांना झोपण्यासाठी चांगली सोय नसल्याने त्यांची झोप न झाल्याने अपघात होण्याचेही प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे एसटीने आता चालक-वाहनकांच्या रेस्टरुमची चांगली सोय उपलब्ध करुन देण्यावर भर दिला आहे.
कराडच्या नवीन बसस्थानकामध्ये चालक-वाहकांच्या रेस्टरुमची सोय आहे. मात्र, त्याला अधिक चांगली करण्यासाठी उप-प्रादेशिक अधिकारी अजित शिंदे आणि त्यांचे बंधु डॉ. बजरंग शिंदे यांनी स्वर्चातून अद्ययावत सोयीची जोड दिली आहे. शिंदे यांचे वडिल एसटीमध्ये चालक होते. त्यामुळे चालकांच्या हालअपेष्टा शिंदेंनी जवळून पाहिल्या आहेत. त्याचा विचार करून शिंदे कुटुंबीयांनी सुरक्षीत प्रवासासाठी चालकांची झोप नीट होणे महत्त्वाचे आहे हे जाणून त्यांच्यासाठी एसी रुम, त्यामध्ये झोपण्यासाठी २९ अद्ययावत बेड, आंघोळीच्या गरम पाण्यासाठी सोलरसह अन्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत. चालकांच्या सोयीसाठी स्वखर्चातून केलेला राज्यातील हा पहिलाचा उपक्रम ठरला आहे.





























































