
सामना प्रतिनिधी । अलिबाग
मुंबई गोवा महामार्गावर माणगावमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर बस आणि टँकर यांची समोर समोरा धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जखमी झाला आहे. अपघातामधील जखमीला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातानंतर मुंबई गोवा महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. तर वाहतूक पोलीस व माणगाव पोलीस अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहे.
मुंबई गोवा महामार्गावर माणगाव जवळील कळमजे फाट्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर बस व टँकर यांची समोरा समोर जोरदार धडक झाली. या धडकेत टेम्पो ट्रॅव्हलरमधील एक जण जागीच ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्तांना वाहनातून बाहेर काढले. जखमी झालेल्या व्यक्तीला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ट्रॅव्हलर बस व टँकर अपघात हा मुंबई गोवा महामार्गावर मधोमध झाल्याने दोन्ही कडील वाहतूक ठप्प झाली. त्यातच आज लग्न मुहूर्त असल्याने मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. अपघातामुळे दोन्ही बाजूला पाच किलोमीटर पर्यत रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे प्रवासी वाहतूक दोन तासापासून वाहतुक कोंडीत अडकले आहेत.
4 Attachments






























































