
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडोरचं काम सुरू आहे. या कामासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर गुरुवारी18 जानेवारी रोजी सहा तास वाहतूक बंद राहणार आहे. यामुळे या वेळात एक्स्प्रेस वेवर होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.
चिखले ब्रिज याठिकाणी उद्या सकाळी 11 ते सायंकाळी पाचपर्यंत काम करण्यात येणार असल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी त्याऐवजी पुण्याकडून मुंबईच्या दिशेनं येणारी हलकी वाहनं वळून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून प्रवास करू शकतील.



























































