
सामना ऑनलाईन । मुंबई
गोरेगावच्या फिल्मसिटीत सध्या ‘बिग बॉस’ मराठीच्या दुसऱ्या सिजनसाठी सेट उभारला जात आहे. मात्र हा शो सुरू होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘बिग बॉस’चे आलिशान घर उभारण्यासाठी फिल्मसिटीतील तब्बल आठ ते दहा पुरातन वृक्षांवर कुऱहाड चालवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये देखील संतापाची लाट आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी शिवसेनेने केली आहे.
फिल्मसिटी येथे शिवमैदान या ठिकाणी ‘इंडोमॉल साइन इंडिया’ या कंपनीने बिग बॉस या रिऑलिटी शोच्या शूटिंगसाठी सेट उभारण्याचे कंत्राट दिले आहे. त्यांनी तेथे सेट उभारण्यासाठी वृक्षतोड केली आहे. 29 एप्रिलला रात्री येथील सुमारे 10 पुरातन वृक्ष शूटिंगच्या सेटसाठी तोडले. या आधी देखील येथे चालणाऱ्या शूटिंगच्या सेटसाठी वृक्षतोड केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू यांनी याप्रकरणी वृक्षतोड करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. एखाद्या सोसायटीने साधी झाडाची फांदी तोडली तरी त्यावर महापालिका गुन्हा दाखल करते; मग फिल्मसिटीत मोठय़ा प्रमाणात सुरू असलेल्या वृक्षतोडीवर तेथील अधिकाऱ्यांचे नियंत्रण कसे नाही? अधिकारी व सुरक्षा रक्षक शूटिंगचे सेट उभारण्याकडे कानाडोळा कसा करतात असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात याप्रकरणी आपण आवाज उठवणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले.
कारवाईसाठी पाठपुरावा करणार
सेट उभारणीसाठी वृक्षतोड करणे ही अत्यंत धक्कादायक आहे. याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी यादृष्टीने आम्ही पाठपुरावा करणार असल्याचे वनशक्ती संघटनेचे स्टॅलिन दयानंद यांनी सांगितले.
बिग बॉसचा सेट उभारताना केवळ दोन झाडांची कत्तल झाली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आम्ही इंडोमॉल साइन इंडिया कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. घडलेल्या प्रकाराबाबत आम्हीदेखील अनभिज्ञ आहोत, असे उत्तर इंडोमॉल कंपनीने आम्हाला दिले आहे. त्यांनी देखील याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी यासाठी फिल्मसिटी प्रशासनानेदेखील पोलीस ठाणे आणि महापालिकेकडे तक्रार दाखल केली आहे.
निवृत्ती मराळे, सहव्यवस्थापकीय संचालक, फिल्मसिटी



























































