
निसर्ग चक्रीवादळानंतर आता तौकते चक्रीवादळाच्या तडाख्याने समुद्रकिनाऱयांवरील गावे उद्ध्वस्त केली. घोंघावत आलेल्या वाऱयाने झाडांपासून घरे आणि विजेच्या खांबांना जमीनदोस्त केले. पण किनारपट्टीच्या भागात जर सुरूची वने आणि केतकीच्या वनांची लागवड केली तर या झाडांच्या नैसर्गिक भिंतीमुळे चक्रीवादळाचा तडाखा थोपवता येतो, असे निरीक्षण राज्याच्या कृषी विभागातील अधिकाऱयांनी नोंदवले आहे.
महाराष्ट्र राज्याला 720 किमी लांबीचा सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. पण निसर्ग व आता तौकते चक्रीवादळाने किनारपट्टीवरील गावे उद्ध्वस्त केली. पण किनारपट्टीवरील कांदळवने, सुरू आणि केतकीच्या वनांमुळे वादळांना थोपवण्यास मदत होत असल्याचे दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील तज्ञांना दिसून आले आहे.
केतकीच्या वनांचे महत्त्व
खाडी किनाऱयावरील कांदळवनांना कायद्याने संरक्षण मिळाले, पण केतकीच्या वनाला संरक्षण मिळालेले नाही. समुद्रावरील वाळूमध्ये केतकी सहज रुजते. समुद्र किनाऱयावरील वाळूची धूप रोखण्याचे काम केतकीची वने करतातच, पण समुद्राकडून येणाऱया वाऱयाला थोपवण्याचे काम ही वने करतात. वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेण्याचे काम केतकीची वने करतात. केतकीची झाडे उंच वाढतात. घट्ट वन तयार होते. वादळ आले तर शेंडे मोडतात. पण खालून घुमारे परत फुटतात. केतकी पूर्णपणे उद्ध्वस्त होत नाही. केतकीचे वन वादळाचा वारा स्वतःच्या अंगावर घेते. निसर्ग चक्रीवादळानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱयांनी किनारपट्टीच्या भागाला भेट दिली तेव्हा केतकीचे वन असलेल्या भागाचे नुकसान कमी झाल्याचे दिसून आले होते.
सुरूच्या झाडांचे महत्त्व
सुरूच्या वनांमुळे वेगवान वारा थोपवला जातो. सुरूची झाडे पंधरा-वीस मीटरच्या संपूर्ण पट्टय़ात लावायची. सुरूच्या झाडांची समुद्रकिनाऱयावर चांगली वाढ होते. सरळसोट झाडे वाढतात. सुरूच्या पाचपंचवीस रांगा लावल्या तर वाऱयाचा वेग थोपवला जातो. वाऱयाचा फटका सुरूच्या पहिल्या दोन रांगांना बसतो पण आतील झाडांमधून जाताना वाऱयाचा वेग कमी होत जातो. निसर्ग चक्रीवादळात दिवेआगारच्या किनारपट्टीवर नुकसान कमी झाले होते. पालघर जिह्यातील केळवा-माहीमच्या किनारपट्टीवरील सुरूची लागवड किनारपट्टीवर केली आहे. 1992-93मध्ये सामाजिक वनीकरण उपक्रमात रत्नागिरी जिह्यात अनेक किनाऱयांवर सुरूची झाडे लावली. पण आठ ते दहा वर्षांनी झाडे तोडून चोरली.
भविष्यातील चक्रीवादळांचा मुकाबला करण्यासाठी आपले समुद्रकिनारे संरक्षित केले पाहिजेत. त्यासाठी सुरूची झाडे व केतकीची वने आवश्यक आहेत. सुरूच्या वनांमुळे वाऱयाचा वेग कमी होतो हे सिद्ध झाले आहे.
– डॉ. पराग हळदणकर, संशोधक संचालक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

































































